बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर: भीमनगरातील रहिवासी माजीनगरसेवक कृष्णा सांडुजी बनकर यांचे बंद घर फोडून सुमारे ५ लाख ३५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्याला गुन्हेशाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत चोरट्यांकडून सुमारे ३ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. निखील आनंद नवगिरे (२४, रा.आमेन चौक, भीमनगर) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार कृष्णा बनकर यांचे नातेवाईक अदालत रोडवरील एका खाजगी रुग्णालयात ॲडिमिट होते.
या नातेवाईकांना भेटण्यासाठी बनकर हे कुटुंबासह ११ नोव्हेंबर रोजी दुपारी रुग्णालयात गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांने त्यांच्या घराचे लॉक ताेडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ३५हजार ५००रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी बनकर यांनी छावणी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात तक्रार नोंदविली होती. गुन्हेशोखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास केला. तेव्हा ही चोरी आरोपी निखील याने केल्याचे त्यांना समजले.
पोलिसांनी रात्री त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेल्या मालापैकी सुमारे ३ लाख ९२ हजारा ८०० रुपयांचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. यात सव्वा लाख रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे. या आरोपीकडून आणखी चोऱ्या, घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक बोडखे, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, पोलीस अंमलदार राहुल खरात, काकासाहेब अधाने, विलास कोतकर आणि तातेराव सिनगारे यांनी केली.
गल्लीतच राहतो चोरटा
आरोपी निखील पूर्वी बनकर यांच्याकडे कामाला होता. बनकर यांच्याकडे मोठी रक्कम असल्याचे आणि घरात दागिनेही असल्याचे त्याला कुणीतरी सांगितले होते. यामुळे तो संधी शोधतच होता. यादरम्यान त्याने त्यांच्या घरातील कपाट्याच्या लॉकची बनावट चावी बनवून घेतली होती. संधी साधून ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली.