औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असलेल्या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खा. खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज भेट घेऊन नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी ( दि. १४ ) रमजान ईद आहे. यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहेत. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस ईदसाठीचे अत्यावश्यक सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. शिवाय काही छोटेमोठे व्यापारी वर्षभरात या महिन्यात मोठा व्यापार करतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. यामुळे ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
ईदनिमित्त होते मोठी उलाढालया वर्षी रमजानचा महिना १२ एप्रिल (बुधवार) पासून सुरु झाला आहे. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभरानंतर सर्व बांधव ईदची मोठ्या उत्साहात साजरी करतात. या काळात विविध खरेदी केली जाते. यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. अनेक छोटेमोठे व्यापारी तर या काळात वर्षभराची उलाढाल करतात. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे.
व्यापारी महासंघाने मागितली चार दिवसांची परवानगीमान्सूनपूर्व काम करण्यासाठी चार दिवस सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच सकाळी ११ ऐवजी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.