छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नऊ मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांचे पक्ष व नावे पाहिली असता दबावतंत्राच्या व बंडखोरीच्या राजकारणाचे संकेत स्पष्ट दिसून आले.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आले. तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस आणि एमआयएमच्या उमेदवारांसाठी अर्ज घेण्यात आले. मध्य मतदारसंघातून शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज घेतले. पहिल्या दिवशी गंगापूर तालुक्यातून बाबासाहेब लगड यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला.
पूर्व व मध्य मतदारसंघातून एमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील, समीर साजेद यांच्यासाठी, तर पूर्वमधून डॉ. गफ्फार कादरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पांडुरंग तांगडे, विठ्ठलराव जाधव यांनी अर्ज घेतले. मध्य मतदारसंघातून शिंदेसेनेसाठी आ. प्रदीप जैस्वाल, उद्धवसेनेसाठी किशनचंद तनवाणी यांनी अर्ज घेतले. पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे जितेंद्र देहाडे, एमआयएमचे अरुण बोर्डे, रमेश गायकवाड यांनीही अर्ज घेतले.
बंडखोरी की दबावतंत्र..?पश्चिम व मध्यची जागा महाविकास आघाडीत उद्धवसेना लढणार आहे. तसेच उमेदवारही जाहीर झाले आहेत. असे असताना काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज नेले आहेत. ही बंडखोरी आहे की दबावतंत्र? यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. पूर्व मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे जाणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही अर्ज नेण्यात आले. पश्चिममधून काँग्रेससाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आले. तर पूर्व मतदारसंघातही उद्धवसेना काँग्रेस उमेदवाराच्या विराेधात बंडखोरी करण्याच्या मूडमध्ये आहे. तसेच मध्य मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराव्यतिरिक्त पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कुणाचे काय ठरले आहे...शहरात भाजपच्या वाट्याला पूर्व मतदारसंघ आला असून उमेदवारी जाहीर झाली आहे. मध्य आणि पश्चिममधून शिंदेसेनेचा उमेदवार असू शकेल. आघाडीचा निर्णय झालेला नाही, तर एमआयएमने देखील अद्याप उमेदवारीचे पत्ते ओपन केलेले नाहीत.
पहिल्याच दिवशी २६८ जणांनी घेतले ५८७ अर्जसिल्लोड- २२ जणांनी ५७ अर्जकन्नड - ३५ जणांनी ८४ अर्जफुलंब्री - २६ जणांनी ६० अर्जऔरंगाबाद (मध्य) - ३१ जणांनी ६७ अर्जऔरंगाबाद (पश्चिम) - २८ जणांनी ५७ अर्जऔरंगाबाद(पूर्व) - ५३ जणांनी ११० अर्जपैठण - ३० जणांनी ६० अर्जगंगापूर - ३३ जणांनी ७३ अर्जवैजापूर -१० जणांनी १९ अर्ज
जिल्ह्यातील मतदारसंघांत कुणी घेतले अर्जजिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, गंगापूर, पैठण, वैजापूर आणि फुलंब्री या ६ विधानसभा मतदारसंघांतून पहिल्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी अर्ज नेण्यात आले. यात सिल्लोडमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार, उद्धवसेनेचे सुरेश बनकर, काँग्रेसचे शेख मोहंमद कैसर, माजी नगराध्यक्ष बनेखाँ पठाण यांच्यासाठी, तर गंगापूरमध्ये विद्यमान भाजपचे आमदार प्रशांत बंब, उद्धवसेनेकडून ॲड. देवयानी डोणगावकर, आमदार सतीश चव्हाण, किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांच्यासाठी अर्ज नेण्यात आले. पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे माजी आ. संजय वाघचौरे, शिंदेसेनेचे विलास भुमरे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे आदींसाठी अर्ज नेण्यात आले.