औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर आणि प्रभागांच्या हद्दींवर एकूण ३२४ आक्षेप दाखल झाले आहेत. आक्षेप दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी आक्षेपांचा अक्षरशः वर्षाव झाला.
महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाररचनेचा प्रारूप आराखडा सादर केला होता. महापालिकेने २ जून रोजी तो आराखडा आणि नकाशा प्रसिद्ध केला. त्यावर नागरिकांच्या सूचना, हरकती मागविण्यात आल्या. सूचना, हरकती स्वीकारण्यासाठी १६ जून ही अंतिम तारीख होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांबद्दल पालिकेच्या निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ जूनपर्यंत ७४ आक्षेप दाखल झालेले होते, १६ जून रोजी शेवटच्या दिवशी आक्षेपांचा वर्षाव झाला. पालिकेची एप्रिल २०२० मध्ये निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डरचनेच्या प्रारूप आराखड्यावर सुमारे नऊशे आक्षेप दाखल झाले होते.
३२४ आक्षेपांची सुनावणी २२ जून रोजी घेतली जाणार आहे. सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी शहरात येणार आहेत. महापालिकेच्या मौलाना आझाद संशोधन केंद्रात सकाळी १० वाजेपासून आक्षेपांच्या सुनावणीला सुरुवात होईल, असे पालिका निवडणूक विभागाने कळविले आहे.