सोमनाथ खताळ , जालना
रुग्णांवर उपचार करायचे असतील तर नातेवाईकांनीच भटकंती करून रक्त उपलब्ध करण्याची वेळ आजस्थितीत निर्माण झाली असून जिल्हा रुग्णालयात पाण्याचा नव्हे तर चक्क रक्ताचाच ठणठणाट असल्याचे शनिवारी समोर आले आहे. मागील तीन दिवसांपासून ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटाचा तुटवडा आहे. केवळ बोटावर मोजण्या इतक्याच पिशव्या शिल्लक राहिल्या असून, त्या केवळ ‘इमर्जन्सी’साठी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. एकिकडे अपघात व विविध आजार जडलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला रक्ताची आवश्यकता असणाऱ्या रुग्णाला देण्यासाठी रक्तच उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना खाजगी रक्तपेढी किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून रक्त मागविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हे वास्तव असले तरी याबाबत अद्यापही आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात रक्तदात्यांना प्रोत्साहन देत शिबीरे घेण्याबरोबरच जनजागृती करण्यास जिल्हा रुग्णालय कमी पडत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांमधून केला जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या ‘ए’ रक्तगटाच्या दोन, ‘बी’च्या ९ तर ‘एबी’ रक्तगटाच्या केवळ सात बॅग शिल्लक आहेत. या बॅगही केवळ इमर्जन्सीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. जर रुग्ण रक्तपेढीत रक्ताच्या पिशवीसाठी गेले तर रक्तपेढीत रक्त नसल्याचे सांगून संबंधीत अधिकारी, कर्मचारी हातवर करून जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येते. परंतु ग्रामीण भागातून आलेल्या अशिक्षित आणि वृद्धांनी कोठून रक्त उपलब्ध करायचे? असा सवाल उपस्थित होत असून रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. खासगी रक्तपेढीचा आधार जिल्हा रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्यसाने शहरातील एका खासगी रक्तपेढीतून रक्त खरेदी करावे लागत आहे.