सिल्लोड : शनिवारी दुपारनंतर जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सिल्लोड तालुक्यातील गोळेगावजवळील जुई नदीवरचा पर्यायी रस्ता नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना झाली. त्यामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती.
वादळी वाऱ्यासह गोळेगाव मंडळात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. वीज पुरवठा खंडित झाला. रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जुई नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पोलिसांनी वाहनधारकांना पर्यायी रस्त्याने जाण्याचे सुचविले. त्यामुुळे वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. गोळेगावपासून आणवा, शिवना अजिंठा या पर्यायी रस्त्यावरून वाहने जळगाव-औरंगाबादकडे जाऊ लागली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते, तर काही वाहने उंडणगाव, हलदा सोयगाव मार्गे जळगाव औरंगाबादकडे रवाना करण्यात आली. अनेक वाहनधारकांना हे पर्यायी रस्ते माहीत नसल्याने त्यांचे हाल झाले. घटनास्थळी तहसीलदार विक्रम राजपूत, सपोनि गिरीधर ठाकूर हे दाखल झाले होते.
ग्रामपंचायतीने दिली होती धोक्याची घंटा
जळगाव - औरंगाबाद रस्त्याचे सहा महिन्यांपासून काम कासवगतीने सुरू आहे. या कामाला तीन महिन्यांची डेडलाईन होती. सदर ठेकेदारांनी हे काम दोन महिने बंद ठेवले. त्यामुळे पावसाळा आला तरी पुलांचे काम झाले नाही. अखेर हा पर्यायी रस्ता वाहून गेला. गोळेगाव ग्रामपंचायतीने एप्रिलमध्येच सदर ठेकेदाराला व अधिकाऱ्याला या धोक्याची कल्पना दिली होती.
फोटो :