योगेश पायघन
औरंगाबाद : दहावीचा निकाल लागला. निकालानंतर तिसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. यावर्षी ग्रामीण भागासह जिल्ह्यातील प्रवेश ऑफलाईनच होणार आहेत. मात्र, अकरावी सीईटी देणाऱ्यांना प्रवेशात प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यानंतर सीईटी न देणाऱ्यांना प्रवेश दिला जावा, अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन झाली तर सीईटीत वेळ घालवण्यापेक्षा ग्रामीण भागात प्रवेशाकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता अधिक आहे.
महाविद्यालये, संस्थाचालक, लोकप्रतिनिधींनी आग्रहाने शहरातील ऑनलाईन प्रक्रियेतून सुटकारा मिळवला. आता सीईटीनंतर प्रवेश प्रक्रिया होणार आहे, तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी स्पष्ट केले आहे. आधी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जावेत, अशा सूचनाही अकरावी प्रवेशाबाबत देण्यात आल्या आहेत. ऑफलाईन सीईटीसाठी सोमवारपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. नामांकित महाविद्यालयांत सीईटी द्यावीच लागणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील अस्पष्ट सूचनांमुळे ग्रामीण भागातील प्रवेशामध्ये गोंंधळाची शक्यता आहे.
प्राविण्य श्रेणी म्हणजे ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार, तर प्रथम श्रेणीत ११ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे गुणांच्या आधारे अनुदानित शाखांत प्रवेशासाठी चुरस होणार आहे. सीईटीतील विद्यार्थ्यांसाठी कोटा निश्चितीही होण्याची शक्यता महाविद्यालयांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अकरावीचा वर्ग असलेली शाळा, कनिष्ठ महाविद्यालये -११६
जिल्ह्यातील एकूण जागा -७२,८६०
शहरातील अकरावी वर्ग असलेल्या संस्था -११६
शहरातील प्रवेश क्षमता-३,१४७०
गेल्या वर्षी ऑनलाईन अर्ज- २६,७५५
ऑनलाईन प्रत्यक्ष प्रवेश - १६,८२५
रिक्त जागा -१४,६४५
---
अकरावीसाठी गावांत प्रवेश का?
---
काॅलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे. उपस्थितीची अट नसते. शिवाय परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष ‘सहकार्य’ करण्याची काही महाविद्यालयांकडून खात्री दिली जाते. ग्रामीणमध्ये प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
----
म्हणून घेतला गावांत प्रवेश
---
गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीत प्रवेश घेऊन इथे शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार नाही. नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. अभ्यासाला शहरात रुम घेऊन सुरुवात केली आहे.
-प्रतीक देवकर, विद्यार्थी,
----
गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात. त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.
-आकांक्षा सपकाळ, विद्यार्थिनी
---
प्रवेश ऑफलाईन पण सीईटीनंतर
----
यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरी सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे.
शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यावर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरीटलिस्ट लावून प्रवेश निश्चिती करू.
-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय
----
अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन असली तरी ग्रामीणकडे ओढा असेल. सीईटी बंधनकारक हवी होती. विद्यार्थ्यांसाठी ते योग्य झाले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू झाली आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून घेत पुढील सूचना आल्यावर काॅलबॅक करून कळवतील.
-बालाजी नागतिलक, प्राचार्य, स. भु. विद्यान महाविद्यालय