औरंगाबाद : शहरात मुसळधार पावसाने ( Heavy Rain in Aurangabad ) अनेक भागांत पाणीच पाणी साचले. दुसरीकडे सलग तिसऱ्या वर्षी जायकवाडी धरण ( Jayakwadi Dam) भरले. तरीही शहराला ६ व्या दिवशी पाणी मिळते, याविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जायकवाडी धरणातून बुधवारी विसर्ग करण्यात आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवरही चांगलीच चर्चा रंगली.
जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्ग होणारे छायाचित्र शेअर करीत सामाजिक माध्यमांवर पाणीपुरवठ्याविषयी कोणी संताप व्यक्त करीत होते, तर कोणी ‘तू (जायकवाडी धरण) किती पण भरला तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार’ अशा विनोदी शैलीत मनपाच्या कारभारावर टीका करीत होते. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी काही महिला आणि तरुणांनी संवाद साधण्यात आला.
आजाराला आमंत्रणजायकवाडी भरून गेले. परंतु नळाला सहा दिवस पाणी येणार नाही, या चिंतेने घरामध्ये जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. त्यातून मग विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. किमान एक ते दोन दिवसाआड पाणी मिळेल, असे मनपाने नियोजन करावे.- ज्ञानेश्वर बनसोडे
नळही आले नाहीतजायकवाडी धरणे भरले. परंतु आमच्या तारांगणनगर, मुकुंदवाडी या भागात तर अजून नळही आलेले नाहीत. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागते. त्यातही पाऊस पडला तर टँकर येतच नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही जार घ्यावे लागतात.- उषा खिल्लारे
मनपाने योग्य नियोजन करावेशहरात पावसामुळे अनेक भागांत पाणीच पाणी साचले. धरणात पाणी नाही, असाही विषय नाही. तरीही आम्हा महिलांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाणी जपून वापरावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.- छाया पिंपळे
शहराचे दुर्दैवचजायकवाडी धरणे भरले तरी औरंगाबादला ६ दिवसांनी पाणी येणार, असा संदेश बुधवारी सामाजिक माध्यमांवरून फिरत हाेता. ही सत्य परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत जायकवाडी धरण वारंवार भरत आहे. परंतु औरंगाबाद रोज अथवा एक दिवसाआड पाणी मिळत नाही, हे शहराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.-मयुर भानुदास पा. बेडके