औरंगाबाद: अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस औरंगाबादमधील एलोरामध्ये आले आहेत. बेजोस त्यांच्या खासगी विमानानं औरंगाबादमध्ये आल्याची माहिती मिळते आहे. बेजोस पत्नी आणि मुलांसह औरंगाबादमध्ये आले आहेत. त्यांनी औरंगाबाद भेटीदरम्यान एलोरामधील लेण्या पाहिल्या. यानंतर ते वाराणसीला जाणार आहेत.
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी जेफ बेजोस यांची ओळख आहे. अॅमझॉनचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या बेजोस यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 141.9 अब्ज डॉलर इतकं आहे. सोमवारीच फोर्ब्सनं जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली. यामध्ये बेजोस यांना पहिलं स्थान मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन संकेतस्थळाचे संस्थापक असलेल्या जेफ बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं.
एक जूनपासून बेजोस यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण 92.9 अब्ज डॉलर इतकी आहे. तर वॉरन बफेट यांच्या संपत्तीचं मूल्य 82.2 अब्ज डॉलर आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत बेजोस यांची अॅमेझॉन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या उत्पन्नाच्या बाबतीत केवळ अॅपल कंपनी अॅमेझॉनच्या पुढे आहे.