लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाची आकडेवारी सोमवारी सकाळी प्राप्त झाली. २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यातील गोंदी, वडीगोद्री, नालेवारी शिवारात सुमारे १२० हेक्टरमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. वडीगोद्री शिवारातील मांगणी नदीला आलेल्या पुरामुळे कपाशी व बाजरी पिकाचे नुकसान झाले. अंबडमध्ये सर्वाधिक तर भोकरदन तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. सोमवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले, मात्र कुठेही पाऊस झाला नाही.अंबड तालुक्यातील अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, वडीगोद्री, गोंदी, रोहिलागड, सुखापुरी या मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. वडीगोद्री शिवारातील मांगणी नदीला पूर आल्याने पाणी नदीचे पात्र सोडून २५ मीटरपर्यंत आत शिरले. त्यामुळे नाल्यालगत असलेल्या नालेवाडी, अंतरवाली सराटी, गुंडेवाडी, गोंदी या गावांमधील पिके वाहून गेली. गोंदी शिवारातील १२० हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. परतूर तालुक्यात ९८.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परतूर, सातोना, आष्टी, श्रीष्टी मंडळात अतिवृष्टी झाली. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, राणी उंचेगाव, रांजनी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, जांबसमर्थ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. घनसावंगी तालुक्यात ९५.७१ मिमी पाऊस झाला. जालना ग्रामीण, विरेगाव, पाचनवडगाव, मंठा तालुक्यातील मंठा, ढोकसाळ, पांगरी गोसावी मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यात २६.७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले असले, तरी तालुक्यातील नदी, नाले कोरडेच आहेत.जाफराबाद तालुक्यात २६.८० मिमी पाऊस झाला. जालना तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. बदनापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच होते. अंबड तालुका वगळता इतरत्र कुठेही पिकांचे नुकसान झाले नसल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.पाणीप्रश्न मिटलाकुंभार पिंपळगाव : गोदावरी नदीवर बाधण्यात आलेला शिवनगाव केटीवेअर दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूर्णपणे भरले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने केटीवेअरचे दोन दरवाजे उघडण्यात आले. मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे गोदाकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
अंबडला जोरदार, भोकरदनला मध्यम पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:14 AM