औरंगाबाद - सोमवारपासून दुपारी चारनंतर बाजारपेठ बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकताच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास जालना रोडवर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतूक मंदावली होती. क्रांतिचौकात वाहतूक शाखेच्या हवालदार सुजाता खरात आणि अन्य एक हवालदार वाहतूक नियमन करीत होते. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनचालक हॉर्न वाजवित होते.
क्रांतिचौकाच्या चारही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचवेळी तेथून जाणारे आ. दानवे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत वाहतूक नियमन सुरू केले. दरम्यान, याचवेळी एक रिक्षाचालक नियम मोडून सुसाट जाऊ लागला. तेव्हा दानवे आणि कार्यकर्त्यांनी रिक्षा रोखली. सर्व वाहनचालक सिग्नलवर उभे असताना तू असा कसा निघाला, असे विचारत त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली. यावेळी त्याने काहीतरी कारण सांगितले. त्याच्यामुळे पुन्हा वाहतूक खोळंबण्याची शक्यता पाहून त्यांनी यापुढे नियमभंग करू नको, असे बजावत त्याला जाऊ दिले. काही वेळात चौकातील वाहतूक सुरळीत सुरू झाली.