छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुन्हा दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे (ठाकरेसेना) जिल्हाप्रमुख असलेले अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत जबाबदारी पार पाडली नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
खैरे म्हणाले, पक्षात गटबाजी झाल्यांचा संशय आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांंना भेटणार आहे. हे सांगितले पाहिजे. नाहीतर पुढे धोका होईल. एकही आमदारकीची जागा येणार नाही. आतापासून काही तरी केले पाहिजे. एक जिल्हाप्रमुख आजारी आहेत. दुसरे जिल्हाप्रमुख हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही आहेत. ते येथे यायचे, १० मिनिटे थांबायचे आणि जायचे. मी एकटा पडलो. मी एकटाच काम करीत होतो. दानवे आता मोठे झाले आहे. आणखी मोठे व्हावे. पण ते जिल्हाप्रमुख आहेत. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. जिल्हाप्रमुखपद सोडले नाही तर काम करायला पाहिजे होते. माझी कैफीयत मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यांच्या हातात निर्णय आहे, असे चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.