महायुतीमध्ये सुरू असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून ही जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळाली आहे. महायुतीकडून येथे पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता येथे अखंड शिवसेनेतील सहकारी असलेले दोन नेते एकमेकांसमोर दिसणार आहेत. यातच, संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
संदिपान भुमरे यांच्यावर निशाणा साधताना अंबादास दानवे म्हणाले, "भुमरे हे शेतकरी आहेत. ते शेतकरी असताना दहा-दहा, अकरा-अकरा विदेशी दारूची दुकानं कशी आली? हा एक प्रश्न आहे. वर्षा नू वर्षे व्यवसाय करणाऱ्या लोकांना एकाचे दोन दुकान व्हायला वेळ लागतो. एकाची दुसरी करायला त्याचं अर्ध जीवन चाललं जातं आणि यांच्या गेल्या वर्ष-दोन वर्षात 11-11 दुकानं या जिल्ह्यात झाले. हा एक मुद्दा आहे." दानवे एबीपी माझा सोबत बोलत होते.
"आता दारूच्या दुकानाला किती ऑन द्यावा लागतो? मला वाटते हे सरकारच्या मंत्र्यालाही माहीत आहे, सरकारलाही माहीत आहे, भुमरे साहेबांनाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. यांनाही चांगले माहीत आहे. किमान 6 ते 10-12 कोटी रुपये एका दुकानासाठी द्यावे लागतात. भुमरे साहेबांकडे माझ्या माहिती प्रमाणे, जे लोक सांगतात 11 दुकानं आहेत. चला यांच्या व्यवसाय दारूचा असता, एवढी भरभराट या व्यवसायाने झाली हेही मान्य केले असते. यांचा हा व्यवसाय नाही," असेही अंबादास दानवे म्हणाले.