अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात टंचाईग्रस्त तालुक्यांच्या यादीमधून अंबाजोगाईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची पुन्हा उपेक्षा झाली आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आजही गावोगावच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. अंबाजोगाईकरांना महिनाभरातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होतो. गुरांना पाणी नाही. चारा नाही, दुबार पेरणीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा स्थितीत अंबाजोगाई तालुक्याचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. यामध्ये अंबाजोगाईलाही वगळण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ठिकाठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. गुरांना पिण्याचे पाणी नाही. चारा नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची दुबार पेरणी झाली. सलग एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने आहे ही पिके संकटात सापडली आहेत. अशी भीषण अवस्था असतानाही टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये अंबाजोगाई तालुक्याचा समावेश झाला नाही. याचा मोठा रोष शेतकरी व्यक्त करीत आहेत.प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा अंबाजोगाई तालुक्यात भीषण टंचाई असतांनाही शासनाने तालुक्यास टंचाईग्रस्त यादीतून वगळले ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णयाचा फेरविचार करावा, वास्तव स्थिती पाहून अंबाजोगाई तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त यादीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे. शासनाच्या निर्णयाचा निषेध अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अंबाजोगाई तालुका टंचाईग्रस्त जाहिर करा या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला. तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शासनाच्या या कृतीचा आपण निषेध व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणाअंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याअभावी भीषण स्थिती असतांना टंचाईग्रस्त तालुक्याच्या यादीत केवळ अंबाजोगाईचाच समावेश झाला नाही. येथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय व हलगर्जीपणाचा मोठा फटका तालुक्याला सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
अंबाजोगाईला महिन्यातून दोन वेळेसच पाणी
By admin | Published: September 01, 2014 12:17 AM