अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाईशहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. अंबाजोगाईचे पाणी पळविल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून आता पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ येणार आहे.देवळा, अकोला, वांगदरी, कारसा पोहरेगाव येथील बॅरेजेसमधील पाणी सोडण्यात आले आहे. तब्बल १.८३ द.ल.घ.मि. पाणी सोडल्यामुळे अंबाजोगाईवरील जलसंकटात आता भरच पडणार असल्याचे चित्र आहे. या बॅरजेसमुळे साठविलेल्या पाण्यावर परिसरातील विहिरी व विंधन विहिरी सुस्थितीत चालत होत्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेही सुकर होते. मात्र आता पाणी सोडल्याने आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. आणखी अर्धा हिवाळा व संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. अशा स्थितीत अंबाजोगाईकरांचे हक्काचे पाणी लातूरने पळविल्यामुळे शेतकऱ्यातही नाराजी आहे. बॅरेजेसमध्ये साठविलेल्या पाण्यामुळे गुरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. आता पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.मांजरा धरणाच्या उभारणीसाठी केज, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या धरणामुळे दोन्ही तालुके सिंचनाखाली येतील, अशी अपेक्षा होती. मात्र धरणातील पाणी लातूर जिल्ह्यासाठी आरक्षित केले जाते. जमिनी आमच्या अन् फायदा लातुरकरांना का? असा सवाल तडोळा येथील शेतकरी अशोक कदम यांनी उपस्थित केला. हक्काचे पाणी कोणी पळवत असेल ते कदापि सहन करणार नाही. अंबाजोगाईला आधी प्राधान्य द्यायला हवे होते. या घटनेचा आम्ही निषेध करतो. याबाबत शासन दरबारी दाद मागणार असल्याचे राकाँचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले.मांजरा धरण डावा कालव्याचे सहायक अभियंता उत्रेश्वर बिराजदार म्हणाले, कालव्यातील पाणी लातूर महापालिकेने पिण्यासाठी आरक्षित केले होते. लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ते सोडण्यात आले आहे. पाणी पळविले असे म्हणता येणार नाही.
अंबाजोगाईचे पाणी पळविले
By admin | Published: November 16, 2014 11:11 PM