लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अपूर्व उत्साह दिसून येत आहे. विविध वसाहती, उत्सव समित्या आणि विहारांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला रॅलींच्या माध्यमातून भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. रात्री बारा वाजेपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष- संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.विविध वसाहतींमध्ये उभारलेल्या स्वागत कमानी, शुभेच्छांचे फ्लेक्स, निळे ध्वज घेऊन धावणाऱ्या रिक्षा, दुचाकी यामुळे संपूर्ण औरंगाबाद शहर जयंतीमय झाले आहे. क्रांतीचौक, नूतन कॉलनी, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, औरंगपुरा, गुलमंडी, सिटीचौक आदी ठिकाणी भव्य स्टेज उभारून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. चौकाचौकांत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंतीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी जवळपास दीड हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कपडे, मिठाई खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. भीमनगर- भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, मिलकॉर्नर, भोईवाडा, जयभीमनगर, लेबर कॉलनी, रोजाबाग, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन आदी भागांत घराघरांवर निळे ध्वज लावण्यात आले असून, आठवडाभरापासून घरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. विहारे, उत्सव समित्यांच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.उद्या सायंकाळी क्रांतीचौकापासून आंबेडकर जयंतीची मुख्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत शहरातील विविध उत्सव समित्यांची सजविलेली वाहने सहभागी होणार असून, ही मिरवणूक भडकलगेटजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होणार आहे. पीपल्स अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत शुक्रवारी रात्री १२ वाजता मेणबत्ती रॅली काढण्यात आली. महाविद्यालय ते भडकलगेटजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत निघालेल्या या रॅलीत प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी४बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास भडकलगेट येथील पुतळ्यासह शहरातील चार ठिकाणी आंबेडकरांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून काँग्रेसच्या वतीने अभिवादन केले जाणार आहे.४पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून भडकलगेट येथील पुतळ्यावर पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर मिलिंद महाविद्यालयाच्या लुम्बिनी उद्यानातील पुतळा, विद्यापीठ गेटसमोरील व विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळा व शेवटी आंबेडकरनगर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आंबेडकर जयंतीचा औरंगाबादेत अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:04 AM
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अपूर्व उत्साह दिसून येत आहे. विविध वसाहती, उत्सव समित्या आणि विहारांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देआज भव्य मिरवणूक : बाबासाहेबांना अभिवादनासाठी पूर्वसंध्येला आबालवृद्धांच्या रांगा