औरंगाबाद : अलीकडे काही वर्षांतील निवाडे बघितले, तर न्यायपालिकाही दलित-बहुजनांच्या हिताविरोधी असल्याचा प्रत्यय येत आहे. दलित-बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याला वेळीच आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी विद्यार्थी संघटना सक्षम व भक्कम करण्याची गरज आहे, असा सूर ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’मधील परिसंवादात निघाला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त नागसेनवनमधील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आजपासून सलग तीन दिवस ‘नागसेन फेस्टिव्हल २०१८’ या महोत्सवाला सुरुवात झाली. मिलिंद महाविद्यालयाच्या लुम्बिनी उद्यानामध्ये आयोजित या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी माधवराव बोरडे, विजय तायडे, प्राचार्य टी.ए. कदम, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, प्राचार्य बी.एस. गंगावणे, उपकुलसचिव प्रताप कलावंत, सचिन निकम, सिद्धार्थ मोकळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी ‘फुले-आंबेडकरी विद्यार्थी चळवळीसमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडताना सचिन निकम म्हणाले की, विद्यार्थी चळवळ हीच पँथरचेदेखील उगमस्थान राहिलेली आहे; पण अलीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंबेडकरी पक्ष-संघटना बोलायला तयार नाहीत. समाजातील स्थिरस्थावर लोकांनी विद्यार्थी चळवळीला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नेते प्रशांत दोन्था म्हणाले, संघटितरीत्या रोहित वेमुलाचा खून करण्यात आला. कारण तो आंबेडकरी विचाराची विद्यार्थी चळवळ चालवत होता. त्याच्या सोबत आम्ही होतो. आम्ही आंबेडकर वाचायला लागलो. आंबेडकर वाचल्यामुळे आमच्यात आत्मसन्मान जागृत झाला. आम्ही ब्राह्मणवादाला विरोध करीत राहिलो. आम्हाला या देशातील ब्राह्मण्यवाद, ब्राह्मण्यवादी विचाराचे सरकार आणि न्यायपालिका या सर्वांविरुद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आंबेडकरी विद्यार्थी संघटना भक्कम करावी लागेल. पुण्याच्या भाग्येशा कुरणे यांनीही आपले मनोगत मांडले. सरकारच्या शिक्षण धोरणावर त्यांनी टीका केली.
‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’परिसंवादामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचे राहुल सोनपिंपळे यांनी अत्यंत परखड भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात दोन प्रकारची विद्यापीठे आहेत. एक सेंट्रल व दुसरे स्टेट विद्यापीठ. सेंट्रल विद्यापीठात एस.सी., एस.टी.चे विद्यार्थी कमी, तर स्टेट विद्यापीठांत यांची संख्या अधिक असते. एस.सी., एस.टी.च्या मुलांना शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यासाठी सेंट्रल विद्यापीठाला अधिक निधी, तर स्टेटच्या विद्यापीठांना निधी अत्यंत कमी दिला जातो. डाव्या-उजव्या पक्ष- संघटना आपल्या विद्यार्थ्यांचा केवळ वापर करतात. त्यासाठी आपली लढाई आपणालाच लढावी लागेल. यापुढे ‘दर्द हमारा, संघर्ष हमारा और नेताभी हमारा’ ही भूमिका घ्यावी लागेल.