गंगापूर : तालुक्यातील जनतेची मागणी लक्षात घेऊन व रुग्णांच्या सोयीकरिता उपजिल्हा रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र या रुग्णवाहिकांना चालक नसल्याने रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले आहे. किमान एक तरी चालक मिळावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
उपजिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नसल्याने भेंडाळा प्रा. आ. केंद्रांतर्गत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतून येथील रुग्णांची ने-आण करण्यात येत असे. गेल्या ८ एप्रिल रोजी वाळूज येथे झालेल्या दुर्घटनेत ही रुग्णवाहिका जळून खाक झाली होती. तेव्हापासून नवीन रुग्णवाहिकेसाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याप्रमाणे ३१ मे रोजी दोन सुसज्ज नव्या रुग्णवाहिका रुग्णालयास मिळाल्या; मात्र येथे चालकाची जागा रिक्त असल्याने मिळालेल्या रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून रुग्णालयाच्या आवारात तशाच उभ्या आहेत. विशेष म्हणजे या दोन वाहनांची पासिंगदेखील झालेली नाही. प्रसूतीसाठी, तत्काळ इलाजाकरिता, तसेच परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यासाठी सध्या खासगी रुग्णवाहिकांचाच जास्तीचे पैसे माेजून आधार घ्यावा लागत आहे. १५ एप्रिल रोजी लोकार्पण झालेली एक रुग्णवाहिका पासिंगच्या नावाखाली माघारी बोलावली होती. ती परत आलीच नाही, ही रुग्णवाहिका शिवसेना व भाजपच्या श्रेयवादामुळे पुन्हा आली नसल्याचे बोलले जात होते, तर दोन महिन्यांपूर्वी मिळालेल्या रुग्णवाहिकेचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी पुढे येत आहे; मात्र रुग्णवाहिकेचे श्रेय घेण्यापेक्षा रखडलेली कर्मचारी भरतीसाठी तरी प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कोट...
कंत्राटी तत्त्वावर चालक भरतीचे अधिकार उपजिल्हा रुग्णालय अधीक्षकांना असून, ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ चालकांचा भरणा करून घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक
300721\20210729_183040.jpg
गंगापुर- चालका अभावी येथील उपजिल्हा रुग्णालयात उभ्या असलेल्या रुग्णवाहिका