वाळूज येथे जवळपास ५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्राचे उद्घाटन तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र, या आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने परिसरातील रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार प्रभारी डॉक्टराकडे आहे. या आरोग्य केंद्रासाठी क्लस्टरमधून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र, रुग्णवाहिकेच्या चालकाच्या वेतनाच्या प्रश्नावरून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रखडला होता. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने वाळूज महानगर परिसरातील कोविड सेंटर्स व आरोग्य केंद्राचा आढावा घेतला होता. यावेळी वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण यांनी केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. अभिजित पाखरे व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करीत चालकाचे वेतन अदा करण्याची तयारी दर्शविली होती. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदावले यांनीही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सरपंच सईदाबी पठाण, जि. प. सदस्य रामदास परोडकर, उपसरपंच योगेश आरगडे, माजी सभापती ज्योती गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, डॉ. अरशदर सय्यद आदींच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, राहुल भालेराव, फैय्याज कुरैशी, नदीम झुंबरवाला, अमजद पठाण, पोपट बनकर, सर्जेराव भोंड, पुरुषोत्तम हाडोळे, अविनाश गायकवाड, रामेश्वर मालुसरे, ताजु मुल्ला, आदींची उपस्थिती होती. यावेळी रुग्णवाहिका चालकाचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ.
वाळूज येथे नवीन रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी सरपंच सईदाबी पठाण, जि. प. सदस्य रामदास परोडकर, योगेश आरगडे आदी.