छत्रपती संभाजीनगर : रुग्णवाहिकांचे टायर फुटून अपघाताच्या घटना घडूनही त्यातून आरोग्य यंत्रणा कोणताही धडा घ्यायला तयारी नाही. जिल्ह्यातील रस्त्यांवर धावणाऱ्या अनेक सरकारी रुग्णवाहिकांचे टायर घासून गुळगुळीत झाले आहेत. टायर बदलण्यासाठी किलोमीटरची मर्यादाही केव्हाच उलटली. तरीही टायर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गुळगुळीत टायरच्या जोरावरच रुग्णवाहिका धावत आहे. यातून काही अपघात झाला तर कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित होत आहे.
रुग्णवाहिका हा रुग्णसेवेचा कणाच आहे. रुग्णाला कमीत कमी वेळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका महत्त्वपूर्ण ठरतात. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांकडे रुग्णवाहिकांचा ताफा आहे. २०२१ ते २०२२ या कालावधीत जिल्ह्याला नव्या रुग्णवाहिका मिळाल्या. आजघडीला अनेक रुग्णवाहिकांचे टायर गुळगुळीत झाले आहे. टायर वापरासाठी असलेली किलोमीटरची मर्यादाही अनेक रुग्णवाहिकांनी ओलांडली आहे. चालकांकडून टायरची परिस्थितीही वरिष्ठांना कळविली जात आहे. मात्र, टायर मिळण्याची नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घासलेल्या टायरच्या जोरावरच रुग्णवाहिका पळविण्याची कसरत रुग्णवाहिका चालकांना करावी लागत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यावरून गुळगुळीत टायरच्या रुग्णवाहिका चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मर्यादा ३० हजार किमीची; धावली लाखावररुग्णवाहिका ३० हजार किमी धावल्यानंतर टायर बदलणे अपेक्षित आहे. मात्र, एक लाखावर रुग्णवाहिका धावूनही टायर मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यावरून टायर खरेदी होतील, जिल्हा स्तरावर खरेदी होतील, यातच टायर अडकले आहे.
किती रुग्णवाहिका?जिल्ह्यात ७४ रुग्णवाहिका आहेत. टायर खराब झाल्याने काही रुग्णवाहिका जागेवरच उभ्या आहेत, तर काही घासलेल्या टायरवर धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी महिनाभरात टायर न मिळाल्यास रुग्णवाहिकाचालकच कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले आरोग्य अधिकारी?जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे म्हणाले, वरिष्ठांकडे टायरची मागणी केलेली आहे. लवकरच टायर उपलब्ध होतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानाेरकर म्हणाले, यासंदर्भातील फाइल प्रक्रियेत असून, १५ दिवसांत टायर मिळतील.