औरंगाबाद : ग्रामीण भागातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शुक्रवारी करण्यात आले. गरोदर महिलांना प्रसूती, प्रसूतीनंतर तत्काळ उपचार मिळावा यासाठी १०२ हेल्पलाइन क्रमांकावर या रुग्णवाहिका उपलब्ध होतील, तर उर्वरित आरोग्य केंद्रांना नव्या रुग्णवाहिका देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी टोपे यांनी स्पष्ट केले.
लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती मोनाली राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. औरंगाबाद तालुक्यातील दौलताबाद, गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा, कन्नडमधील करंजखेड, पैठणमधील ढाकेफळ, निलजगाव फुलंब्रीतील गणोरी, जातेगाव आणि सिल्लोडमधील पालोद व पानवडोद आरोग्य केंद्रांना रुग्ण्वाहिका देण्यात आल्या.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानावर मिळालेल्या व्याजाच्या बचतीमधून राज्य शासनाने ५०० रुग्णवाहिका पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी नियोजन सुरू असून, त्यासाठी आमदारही मदत करत आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० घेतल्या असून, यंदाच्या अर्थसंकल्पात ५०० रुग्णवाहिकांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. लसींचा पुरवठा अखंडित राहावा. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली.