औरंगाबाद : सुंदर शहर म्हणून इंदूर पाहण्यासाठी जाण्याची गरज नाही. ऐतिहासिक औरंगाबाद शहर कचरामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ११५ पैकी ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. २०२० मध्ये संपूर्ण शहर कचरामुक्त होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मनपातर्फे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’या उपक्रमांतर्गत वॉर्डांमध्ये स्वच्छ सुंदर वॉर्ड स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत ५५ वॉर्डांनी सहभाग घेतला. यातील ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. सिडकोच्या संत तुकाराम नाट्यगृहात वॉर्ड स्पर्धेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेता जमीर कादरी उपस्थित होते.
घोडेले म्हणाले की, कचरा प्रश्न एक संकट असले तरी यातून निश्चित मार्ग निघणार आहे. महापालिकेवर आर्थिक संकटही घोंगावत आहे. यातूनही मार्ग काढण्यात येत आहे. महापालिका दिवाळखोरीत अजिबात जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. कचरा टाकणाºाांना गांधीगिरी करून त्यांना गुलाबपुष्प देऊन कचरामुक्तीमध्ये सहभागी करून घेतले जाईल. संपूर्ण शहर एप्रिल २०२० पर्यंत कचरामुक्त होईल, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. प्रास्ताविक नंदकिशोर भोंबे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदीप सोनार, ब-हाडकर यांनी केले. यावेळी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी कचरामुक्तीसाठी भारूड सादर केले. पार्थ चांदोरकर याने एकपात्री अभिनय सादर केला.