लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेंतर्गत निधी संपला म्हणून मागील ८ महिन्यांपासून काम बंद करण्यात आले आहे. शहरामध्ये अंतर्गत ८५ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन टाकावयाच्या आहेत. या लाईन महापालिका निधीतून टाकता येऊ शकतात का, यासाठी किती खर्च येऊ शकतो याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. खर्चाचे आकडे समोर आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचा सावध पवित्राही त्यांनी घेतला. कंत्राटदारावर सोपविण्यात आलेले दायित्व महापालिकेने का करावे यावर त्यांनी अधिक भाष्य केले नाही.भूमिगत गटार योजनेतील निधी संपला म्हणून मागील महिन्यात ८० कोटी रुपये कर्ज काढण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. शासन अधिपत्याखालील संस्थेकडून कर्ज मिळण्याची शक्यता धूसर असल्याचेही महापौरांनी नमूद केले. कंत्राटदाराने ८ महिन्यांपासून काम थांबविले आहे. ड्रेनेज लाईनच्या जोडण्या पूर्ण करून घेणे, रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करून घेणे, शहरात ८५ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन टाकणे आदी कामे बाकी आहेत. कंत्राटदार निधी नसल्याने काम करण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिकेने हे काम केल्यास किती खर्च येऊ शकतो, याचा आढावा घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचेही महापौरांनी नमूद केले.
मनपा ८५ किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:08 AM