जिल्ह्यातील रस्ते कामे वेळेत पूर्ण करा
औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्ते कामांची अर्थसंकल्प अंदाजपत्रके तयार करून निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण कराव्यात, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिली. सुभेदारी विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता डी.डी. उकिर्डे, अधीक्षक अभियंता एस.जी. देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, कार्यकारी अभियंता वाय.बी. कुलकर्णी, नरसिंग भंडे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खबरदारीसह मतदार दिवस साजरा करावा
औरंगाबाद : मतदार हा लोकशाही व्यवस्थेची ताकद असतो. जागरूक मतदार प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह राष्ट्रीय मतदार दिवस व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने पूर्वतयारीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.
कृषी, अन्न प्रक्रिया योजनेसाठी आवाहन
औरंगाबाद : अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाल्यासारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेत प्राधान्य आहे. या योजनेचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावर स्वीकारण्यात येणार आहे, असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे. अन्नधान्य, कडधान्ये, तेलबिया उत्पादने किंवा सुरू असलेले शासकीय, सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक, कंपनी, गट, महिला स्वयंसाहाय्यता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्थांना योजनेत प्राधान्य आहे.