छत्रपती संभाजीनगर : जि. प.च्या २,१०० शाळांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या विषयांची माहिती देणारी सचित्र ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली मदत प्रथम बुक्स ही संस्था करणार असून, त्यासाठी सीएसआर फंडाचाही वापर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशनने २००१ मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामधील माहिती देण्यासाठी ‘स्टेम’ शिक्षण पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. शाळेत मुले साक्षर होतात. मात्र, या चार विषयांमध्ये साक्षर झाल्यास मुलांमध्ये शोध घेण्याची, नवनव्या गोष्टींना धुंडाळण्याची वृत्ती वाढते. आयुष्यभर ज्ञानार्जनासाठी मनोवृत्ती बाळगणे आणि कुठल्याही मूलभूत विचार करणे शक्य होते. हे चार विषय मुलांना घाबरविणारे आणि समजण्यास कठीण वाटतात. मात्र, या विषयांच्या संकल्पना मजेदार आणि आकर्षक पद्धतीने मांडल्यास मुलांना त्या समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होते. मुलांना या अमूर्त संकल्पना मजेदार पद्धतीने आणि आपल्या आयुष्याशी जोडलेल्या मार्गाने शिकण्यास मदत करण्यासाठी ‘स्टेम’ विषयाची सचित्र पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ज्ञानार्जनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रथम बुक्सच्या मदतीने जिल्ह्यातील २१०० शाळांमध्ये ‘स्टेम’ ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात सीईओ विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रथम बुक्सचे सीईटो हिमांशू गिरी उपस्थित होते. तसेच अविनाश रावत, बंगळुरू येथील व्यंकट सुधाकर, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या डॉ. सुनीता राठोड, संजय सिंग, रेश्मा अग्रवाल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या देशमुख, अविनाश रावत, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे नियोजन शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, रविराज नगर, विस्तार अधिकारी संगीता साळवे, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. सोज्वल जैन यांनी केले. प्रवीण लोहाडे यांनी संचालन केले.