औरंगाबाद : थायलंड, व्हिएतनामसह जगभरात होणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची शेती आता औरंगाबादेत बाळसे धरते आहे. जिल्ह्यात १०० एकरांवर ड्रॅगन फ्रूटची बाग ब्रह्मगव्हाण शिवारासह विविध भागांत फुलवली आहे. ड्रॅगन फ्रूट पीक लागवडीचा खर्च अधिक असला तरी धोका कमी आणि उत्पन्न अधिक म्हणून या शेतीकडे आपण वळलो, असे गंगामाई कृषी उद्योगाचे चेअरमन पद्माकर मुळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईन बनते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेसपॅक म्हणूनही वापर होतो. त्याच्या प्रक्रिया उद्योगासाठीही येथील काही समूहांनी तयारी सुरू केली आहे. मुळे यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मगव्हाण शिवारात २१ जून २०२१ला ड्रॅगनची लागवड झाली. त्या फळांची आता काढणी सुरू आहे. अडीचशे ग्रॅम ते आठशे ग्रॅमपर्यंत फळांना सव्वादोनशे ते दीडशे रुपयांपर्यंतचा भाव ग्रेडनुसार मिळत आहे. या काटेरी झाडाला रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत फुले येतात. त्या फुलांचा फळे बनण्याचा ४५ दिवसांचा प्रवास लक्षणीय आहे. लागवडीचे तंत्रज्ञान शेतकरी जाणून घेत असल्याचे संजय पाटील म्हणाले.
अशी आहे लागवडसिमेंटचे साडेसात फुटांचे चार इंच बाय चार इंच मजबूत पोल शेतावरच बनवले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने अडीच फुटांची रुंद सरीत दहा बाय दहा फुटांवर दीड फूट खोल पोल माती मुरुमात रोवण्यात आला. त्यावर २०० एमएमची सळई टाकून प्रत्येक दीड फुटावर बांबूचा आधार देण्यात आला. दोन पोलमध्ये एक फुटांच्या अंतरावर दोन रोपे लावण्यात आली आहेत. बेडमध्ये १० टन शेणखतात १ टन मळी मिश्रण करून दहा फुटांमध्ये तीन टोपले सुमारे ३० किलो भरण्यात आली. त्यानंतर लागवड केली.
अतिघन लागवडीतून वाढवले उत्पन्नया पिकाला पाणी कमी लागले. केवळ बेड ओले ठेवण्यासाठी २० एमएम लॅटरल इनलाईन ठिबकची व्यवस्था करण्यात आली. या अतिघन लागवडीने दहा फुटांत आठऐवजी चाैदा रोपांची लागवड केल्याने नियमित लागवड पद्धतीत २ ते अडीच हजार रोपांएवजी ५ हजार ४०० रोपांची लागवड झाल्याने उत्पन्नातही वाढ होईल, असे येथील व्यवस्थापक मोहन तपसे, योगेश जाधव यांनी सांगितले.
काय आहे फळात?ड्रॅगन फ्रूट कोलेस्ट्रॉल, साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, पचनक्रिया सुरळीत करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. इतर आजारांसाठीही हे फळ गुणकारी आहे. काही वर्षांपूर्वी भारतात आलेले हे फळ दीडशे ते दोनशे रु. किलोने मिळते.
प्रोत्साहनासाठी योजनाएकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कृषी विभाग ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख ६० हजार रु. अनुदान दिले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९६ हजार (६० टक्के) तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात २० टक्के अनुदान दिले जाणार आहे. २०२२-२३ साठी जिल्ह्यातून ५२ अर्ज बुधवारपर्यंत आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षात या क्षेत्रात आणखी वाढ होऊ शकते.
भावापेक्षा दुसरा धोका नाहीगंगामाई कृषी उद्योग सोडून ३० ते ३२ शेतकऱ्यांनी पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाण्याच्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवरील या पिकाला भावाशिवाय इतर नैसर्गिक आपत्तीचे फारसे धोके नाहीत. ड्रॅगन फ्रूटला मेट्रो सिटीतून मागणी असून याच्या गुणधर्माबद्दल जनजागृती झाल्यास क्षेत्र वाढेल.-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी, औरंगाबाद.