छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाची विद्यापीठ प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नसतानाच विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क तब्बल ५० टक्क्यांहून अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये वसतिगृह विकास समितीने शिफारस केलेल्या शिफारशीनुसार वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याचा ठराव २६व्या क्रमांकावर होता. हा विषय बैठकीला चर्चेला आल्यानंतर सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यावर कोणत्याही सदस्याने मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शुल्कवाढ पुढे ढकलण्याची मागणी केली नसल्याचेही समोर आले. एकमतानेच हा निर्णय मंजूर केला. या शुल्कवाढीचे चटके आता ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना बसणार आहेत. त्यामुळे या निर्णयास विद्यार्थ्यांमधून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
शुल्कवाढ अशीव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार वसतिगृहाचे वार्षिक शुल्क २ हजार ६५ रुपये होते. त्यात ५० टक्क्यांची वाढ करून ३ हजार २०० रुपये होणार आहे. वसतिगृह प्रवेशाची अनामत रक्कम २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली. विदेशी विद्यार्थिनी वसतिगृहाचे शुल्क २५ हजार रुपयांवरून ३५ हजार रुपये करण्यात आले. तसेच विदेशी विद्यार्थ्याच्या जोडीदारासाठी वार्षिक १२ हजार ५०० रुपयांऐवजी २० हजार रुपये शुल्क करण्यात आले. तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट चार्ज प्रतिदिन २५ रुपये होता. तो आता ५० रुपये करण्यात आला आहे.
या समितीने केली होती शिफारसविद्यापीठातील वसतिगृहांच्या संदर्भात वसतिगृह विकास समितीची प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची ६ एप्रिल रोजी बैठक झाली. या बैठकीला कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, पदवीधर विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन परिषदेतील सदस्य डॉ. योगिता होके-पाटील, ॲड. दत्ता भांगे, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. याच बैठकीत ऐन दुष्काळात वसतिगृहांचे शुल्क वाढविण्याची शिफारस करण्यात आली.