गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:02 PM2024-09-10T12:02:53+5:302024-09-10T12:06:06+5:30

गणेश उत्सवाच्या आडून आगामी राजकारणाचे मनसुबे रचले जात आहेत. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेनेत गणेशाेउत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून आले.

Amid Ganeshotsav, Politics in full swing; Ahead of the assembly elections, the ganesh mandals at centre place | गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं

गणेशोत्सवाच्या मांडवात, राजकारण जोमात; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचे चांगभलं

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राजकीय माहोल तयार होत आहे. आता सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. सार्वजनिक उत्सवांपैकी एक असलेला दहीहंडी उत्सव आणि तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे यंदा हा उत्सव साजरा करण्यात राजकीय पक्षांत स्पर्धा लागली होती. त्यानंतर, आता श्रीगणेशोत्सवाच्या मांडवात राजकारण जोमात असल्याचे दिसू लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा उत्सव आल्यामुळे मंडळांचे चांगभले झाल्याचे दिसते आहे.

गणेश उत्सवाच्या आडून आगामी राजकारणाचे मनसुबे रचले जात आहेत. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेनेत गणेशाेउत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. शहरातील तिन्ही मतदारसंघांत लहान-मोठ्या गणेश मंडळांना विद्यमान आणि इच्छुक विधानसभा उमेदवारांनी हातभार लावल्याची चर्चा आहे. ढोलपथक, टी शर्ट बनवून देण्यासह, महाप्रसाद, मिरवणुकीसाठी डीजे, तरुण-आबालवृद्धांच्या आकर्षणासाठी विशेष कार्यक्रमांसाठी राजकीय पक्ष, नेते हातभार लावत आहेत. शहरात सायंकाळाच्या सुमारास मानाच्या व गर्दीच्या श्रीगणेशाच्या आरतीला जाण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे.

शिंदेसेनाही आघाडीवर
शिंदेसेनेनेही शहरी मतदारसंघात गणेश मंडळ प्रायोजित केली आहेत. मध्य आणि पश्चिम, फुलंब्री मतदारसंघात शिंदेसेनाप्रणित गणेश मंडळाची चलती आहे. ढोलपथक, झांजपथक, मिरवणुकांसाठी शिंदेसेनेने तयारी केली आहे.

भाजपची १२० मंडळे
भाजपने ९ मंडळांत ३८ प्रभागांमध्ये संघटन असून, एका प्रभागात तीन गणेश मंडळे भाजपप्रणित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातून सुमारे १२० मंडळे भाजपची आहेत. प्रत्येक प्रमुख चौकात भाजपप्रणित गणेश मंडळे आहेत. लाडकी बहीण योजना, शासनाच्या योजनांचा प्रसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून करावा, अशा सूचना सर्व मंडळांना देण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महाप्रसादासाठी सहकार्य
महाप्रसादासाठी अनेक मंडळांना हातभार लावला आहे. त्यातून बहुतांश मंडळांसमोर महाप्रसादाचे सौजन्य कुणाचे आहे, याचे होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आडून निवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ सध्या सुरू असल्याचे दिसते आहे.

इच्छुक टी-शर्ट घालून आरतीला
शहरातील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार मंडळांचे टी शर्ट घालून आरतीला हजेरी लावत आहेत. यातून वातावरण निर्मिती होण्यासह स्वत:च्या नावाचा प्रसार कसा होईल, यावर उमेदवारांनी भर दिला आहे.

उद्धवसेनेची १०० मंडळे
उद्धवसेनेची १०० गणेश मंडळे शहरात आहेत, असा दावा करण्यात येत आहे. प्रत्येक चौकात मंडळ स्थापन केले असून, यंदाच्या उत्सवात सामाजिक उपक्रम राबविण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक चौकात पक्ष पदाधिकाऱ्यांचे मंडळ आहेत. वॉर्डनिहाय असलेल्या मंडळांनाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुका समोर ठेवून कामाला लावण्यात आले आहे.

Web Title: Amid Ganeshotsav, Politics in full swing; Ahead of the assembly elections, the ganesh mandals at centre place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.