औसा : औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा येथे रविवारी दुष्काळ परिषद घेण्यात आली़ मात्र या परिषदेकडे आमदार अमित देशमुख व आमदार त्रिंबक भिसे यांनी पाठ फिरविली़ प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषद होत असताना लातूर शहर व लातूर ग्रामीणचे आमदार नसल्याने कार्यकर्त्यांत कुजबूज होती़ औसा नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या दुष्काळ परिषदेला आ़ बसवराज पाटील मुरुमकर, माजी मंत्री आ़मधुकरराव चव्हाण, आ़अमर राजूरकर यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़व्यंकट बेद्रे, प्रदीप राठी, अशोकराव पाटील निलंगेकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती. मात्र या परिषदेत लातूर शहरचे आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली़ लातूर शहरात झालेल्या पत्रकार परिषद तसेच शहरातील अन्य कार्यक्रमास या दोन्ही आमदारांची उपस्थिती होती़ पण औसा येथे झालेल्या दुष्काळ परिषदेला मात्र त्यांची अनुपस्थिती होती़ दरम्यान, काँग्रेस पक्षातील एका जेष्ठ नेत्यास विचारले असता त्यांनी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यक्रम असल्यामुळे आमदार अमित देशमुख दुष्काळी परिषदेला आले नसल्याचे सांगितले़
अमित देशमुख, भिसेंची दुष्काळ परिषदेकडे पाठ
By admin | Published: May 08, 2016 11:23 PM