यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढेल, याचा पुनरुच्चार केला. येत्या पंधरवड्यात गांधी भवनात बूथ कमिट्यांची बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. औरंगाबाद महापालिकेतही ती असावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत देशमुख यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवू इच्छिते व इथल्या जनतेसाठी पर्याय ठरू शकते, हा संदेश गेला पाहिजे व त्यादृष्टीने इच्छुक उमेदवारांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपला संपर्क वाढविला पाहिजे व घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला पाहिजे, असा हितोपदेश त्यांनी यावेळी केला.
मंचावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांशी व समोर बसलेल्या कार्यकर्त्यांशीही त्यांनी प्रश्नोत्तराच्या रूपात थेट संवाद साधला.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी अमित देशमुख यांचे स्वागत केले.
मंचावर आमदार राजेश राठोड, डॉ. जितेंद्र देहाडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा थोरात यांच्यासह फ्रंटल ऑर्गनायझेशनचे हमद चाऊस, मुजफ्फर खान पठाण, मुदस्सर अन्सारी, जीएसए अन्सारी, शेख अथर आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आभार मानले.