संतोष वीर । लोकमत न्यूज नेटवर्कभूम : तत्पर आरोग्य सेवेसाठी म्हणून परिचित असलेल्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेमुळे भूम ग्रामीण रूग्णालयात आलेल्या रूग्णासह नातेवाईकांना शनिवारी रात्री मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला़ डॉक्टरांचे रूग्णाकडे झालेले दुर्लक्ष़़ १०८ च्या एका गाडीचा जाग्यावर नसलेला चालक व दुसऱ्या रूग्णालयातून मागविलेली रूग्णवाहिका, असा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना पहावयास मिळाला़ याचा फटका रूग्णासह नातेवाईकांना बसला़ग्रामीण रूग्णालयातील कामकाजाची शनिवारी रात्री पाहणी केली़ रात्रीच्यावेळी एक डॉक्टर, एक परिचारिका, एक सेवक यांच्यावरच रूग्णांचा भार असतो़ डॉक्टर रात्री साधारणत: १२ पर्यंत थांबतात, त्यानंतर एर्मजन्सी असेल तर आॅनकॉल येतात, असे काहींनी सांगितले़ शनिवारी रात्री १०़३० वाजण्याच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने शिवराम तात्या शिंदे (वय-६५, रा़वाकवड) यांना ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते़ त्यावेळी उपस्थित डॉ़ सपकाळ यांनी प्रथमोपचार करणे गरजेचे असताना त्यांना थेट उस्मानाबादला जाण्याचा सल्ला दिला़ रूग्णाला काय झाले ? या प्रश्नावर डॉ़ सपकाळ यांनी ‘तुम्हाला एकदाच सांगितले ना की तुमच्या रूग्णाचे सिटीस्कॅन करावे लागेल, तुमच्या रूग्णावर येथे कोणतेही उपचार होऊ शकत नाहीत़ तुम्ही तुमचा रूग्ण उस्मानाबाद येथील अतिदक्षता विभागात न्या’ असे सांगितले़ नातेवाईकांनी आल्यापासून शुगर चेक केली इतर काही तरी उपचार केले का ? असे विचारल्यानंतर परिचारिकेला एक इंजेक्शन देण्यास सांगितले़ त्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आले़नातेवाईकांनी रात्री १०८ क्रमांकाच्या रूग्णसेवेसाठी फोन केला़ डॉक्टरांशी बोलणे करून देण्यातच २० मिनिटांचा वेळ गेला़ या दरम्यान, रूग्ण शिवराम शिंदे यांना पोटाचा त्रास अधिकच वाढला होता़ त्यांची प्रकृती ढासळत असल्याने पुन्हा रूग्णवाहिकेला फोन लावण्यात आला़ रूग्णवाहिकेवर गावातीलच डॉ़ शेंडगे यांची ड्युटी होती़ त्यानंतर डॉ़ शिंदे हे तातडीने रूग्णालयात दाखल झाले़ रूग्णाची बि़पी़ चेक करून सलाईन लावले़ मात्र, रूग्णवाहिकेचा चालक नसल्याने वाशी येथून गाडी मागविण्यात आली़ वाशी येथील रूग्णवाहिका आल्यानंतर रूग्णाला उपचारासाठी रेफर करण्यात आले़ रूग्ण ग्रामीण रूग्णालयात आल्यापासून वाशी येथील रूग्णावाहिका येईपर्यंत जवळपास अडीच तासाचा वेळ गेला़ भूम शहरासह तालुक्यातील ९५ गावातील रूग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येतात़ मात्र, या रूग्णालयात रात्री संध्याकाळी एक डॉक्टर, एक परिचारिका, एक सेवक यांच्यावरच सर्व भार येतो़ तर अनेकवेळा रात्री १२ नंतर डॉक्टर घरी असतात़ रूग्णालयातून कॉल आल्यानंतर ते येतात़ अशा परिस्थितीत प्रकृती गंभीर असलेला रूग्ण असेल तर नातेवाईकांच्या अडचणीत भरच पडते़ रिक्तपदांसह इतर असुविधाही या रूग्णालयात आहेत़ याचाही फटका रूग्णांसह नातेवाईकांना बसताना दिसले.
अडीच तासांनी दाखल झाली रूग्णवाहिका !
By admin | Published: May 14, 2017 11:14 PM