औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्र परिसरातील कामासाठी कंत्राटदारावर कृपादृष्टी ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने आगाऊ रक्कम अदा केली. मात्र, काम पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.आता सदरील कामासाठी तरतूद नसल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता सांगत आहेत, तर दुसरीकडे कंत्राटदाराला अर्धी रक्कम अदा केल्याचे कनिष्ठ अभियंते सांगत आहेत. या प्रकरणात नेमके खरे कोण आहे, याबाबत वरिष्ठांनी चौकशी करणे गरजेचे आहे. या सगळ्यादरम्यान प्रशिक्षण केंद्रातून ड्रेनेजचे काम अर्धवट राहिल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत कम्युनिटी सेंटरच्या दिशेने येत आहे.सप्टेंबर महिन्यात बी-१ या प्रकरात सदरील प्रशिक्षण केंद्रातील इमारतीला रंगरंगोटी करणे आणि ड्रेनेजचे काम करण्याचे कंत्राट बांधकाम विभागाने दिले. त्या कामाची मुदत किती आहे, याबाबत संबंधित अभियंत्यांनी काहीही माहिती दिली नाही.दोन इमारतींना गुलाबी रंग मारण्यात आला असून, तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. तीन थर अॅक्रिलिक कलर मारण्याची अंदाजपत्रकात तरतूद आहे; परंतु इमारतीला मारण्यात आलेला रंग येथील स्थानिक कंपनीकडून खरेदी करण्यात आला आहे.मेजरबुक क्रमांक ४७२०१ ते ४७३०० पर्यंत या कामाच्या मोजमापाची नोंद करण्यात आली आहे. सदरील नोंदी आणि मुळात झालेले काम याचा ताळमेळ बसेल की नाही, याबाबत शंका आहे. विशेष म्हणजे कलर मारण्यात आलेल्या दोन्ही इमारती वापरात नाहीत. तरीही त्या इमारतींचे रंगकाम करण्यात आले आहे.एनआरएचएमअंतर्गत साडेतेरा लाख रुपयांहून अधिक रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यातील ११ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंत्राटदार अमोल कळसकर यांना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम देण्यापूर्वी संबंधित अभियंत्यांनी प्राचार्य डॉ. सुधाकर शेळके यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. दरम्यान, याप्रकरणी डॉ. शेळके यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, दोन्ही इमारतींचे आणि ड्रेनेजचे काम सध्या सुरू असून, केंद्रातील दोन कर्मचारी कामाच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहेत. ड्रेनेजचे काम अर्धवट पडले असून, त्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे, यावर ते म्हणाले संबंधित विभाग लवकर काम पूर्ण करील.बांधकाम विभागातील अभियंत्यांचे मत असे...बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक येरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, शासकीय इमारतीचे काम आहे. काम पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंत्राटदाराला आगाऊ रक्कम दिलेली नाही. उलट हेडमध्ये कामाची तरतूद नाही, तर कनिष्ठ अभियंता प्रीती मोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, काम अंतिम टप्प्यात आहे. कंत्राटदाराला अर्धी रक्कम अदा केली आहे. अंदाजपत्रक तांत्रिक स्तरावर आहे. ड्रेनेजचे काम पूर्ण न झाल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ड्रेनेजचे काम बंद पडले आहे. कामाची काही डेडलाईन आहे काय? यावर त्या म्हणाल्या की, कामाला डेडलाईन नाही.
काम पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला दिली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:04 PM
: सिडको एन-६ परिसरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्र परिसरातील कामासाठी कंत्राटदारावर कृपादृष्टी ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने आगाऊ रक्कम अदा केली. मात्र, काम पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्देआधी दाम; नंतर काम : सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप