- श्यामकुमार पुरेसिल्लोड (औरंगाबाद) : पडेगावजवळ भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या एका कारने चिरडल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा रविवारी मृत्यू झाला. या एका अपघाताने ३ लहान मुली व एक ८ महिन्याचा तान्हुला अनाथ झाला आहे. कसे जगावे, पुढचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न या चिमुकल्या मुलींना पडला आहे. केवळ वृद्ध आजीची साथ या चौघांना आहे. हृद्यपिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
रविवारी औरंगाबाद शहरात एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या काकाला भेटण्यास दुचाकीवर आलेला पुतण्या विष्णू त्र्यंबक वाघ ( ३८ ) आणि त्याची पत्नी सविता (३२) यांचा पडेगावजवळ अपघात झाला. यात पुतण्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या अपघातात ८ महिन्यांचा चिमुकला बचावला होता.मृतांवर सिल्लोड तालुक्यातील मुळगाव खुल्लोड येथे सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
विष्णू वाघ हे कन्नड साखर कारखान्यात कामगार होते. कुटुंबातील कर्ते आई-वडील गेल्याने आता तीन मुली आणि ८ महिन्यांचा मुलगा अनाथ झाले आहेत. मुली दुसरी, चौथी आणि सहावीत शिक्षण घेतात. या चिमुकल्यांना आता केवळ वृद्ध आजीचा सहारा आहे. त्यांचे शिक्षण आणि उपजीविकेसाठी दानशुरांनी, सामाजिक संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आजीसह गावकऱ्यांनी केले आहे.
मदतीसाठी : विष्णू त्र्यंबक वाघ:स्टेट बँक ऑफ इंडिया: शाखा कन्नड आयएफएससी कोड SBIN 0020011खाते क्रमांक 33266951641