छत्रपती संभाजीनगर : बी. फार्मसी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने पालकांना फोन करून आता पुन्हा कधीच घरी परतणार नाही, सेव्हन हिल उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे कळविले. घाबरलेल्या आई-वडिलांनी उड्डाणपुलाकडे धाव घेतली. वडिलांना पाहिल्यानंतर तरुणीने उड्डाणपुलाच्या मध्यभागातून खाली उडी मारल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. तरुणी पायावर पडल्यामुळे बालंबाल बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराबाहेरील एका बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये २१ वर्षांची तरुणी तृतीय वर्षात शिक्षण घेते. तिने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडिलांना फोन करून आता मी घरी येणार नाही. उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या करणार असल्याचा निरोप दिला. या फोननंतर आई-वडिलांनी दुचाकी काढून सिडकोसह इतर उड्डाणपुलांवर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, सेव्हन हिल उड्डाणपुलावर एक दुचाकी व मुलगी थांबलेली असल्याचे पालकांना दिसले. तरुणीनेही वडील आल्याचे पाहिल्यानंतर थेट उड्डाणपुलावरून खाली उडी घेतली. तिने उडी घेतली, तेव्हा पुलाखालील रस्त्यावरून वाहतूक नव्हती. सिग्नल लागलेला होता. तरुणी थेट पायावर पडली. त्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून, तोंडालाही मार लागला आहे. उड्डाणपुलाखाली असलेल्या एका तरुणाने तत्काळ रिक्षातून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक प्रशांत पासलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीसह तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला. या घटनेची नाेंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली.
मित्रावरून झाला होता वादपोलिसांच्या माहितीनुसार तरुणीचा तिच्या आई-वडिलांसोबत एका मित्रावरून वाद झाला होता. त्या मित्रासोबत बोलण्यास पायबंद घातल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे चौकशीत समोर आले आहे.