वाळूज महानगर : खोडसाळपणामुळे पेट्रोल टाकून दोन दुकाने जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास साजापुरात घडला. या आगीच्या घटनेत इलेक्ट्राॅनिक्सच्या दुकानातील काऊंटर, इतर साहित्य तर किराणा दुकानातील मिठाच्या गोण्या अर्धवट जळाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
सोहेल नजीर खान (रा. साजापूर) यांचे साजापूर गावात मुख्य रस्त्यावर गॅलेक्सी इंटरप्रायजेस या नावाचे इलेक्ट्रिकलचे दुकान असून, या दुकानालगत त्यांनी शंकर वैद्य यांना किराणा दुकान चालविण्यासाठी भाड्याने दिले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वैद्य यांचा मुलगा मयूर हा दुकान उघडण्यासाठी आला असता त्यास दुकानासमोर ठेवलेल्या मिठाच्या गोण्या अर्धवट जळालेल्या तसेच गॅलेक्सी इंटरप्रायजेस व आपल्या वडिलांचे किराणा दुकानाचे शटर काळवंडलेले दिसून आले. मयूरने या घटनेची माहिती वडील व दुकान मालकाला दिली. सोहेल खान व वैद्य यांनी पाहणी केली असता त्यांना दोन्ही दुकाने जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले.
सोहेल खान यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता त्यांना रात्री १.३० वाजेच्या सुमारास २० ते २२ वयोगटातील दोन तरुण दुकानाजवळ येताना दिसून आले. अवघ्या काही क्षणांत एका तरुणाने सोबत आणलेले पेट्रोल दोन्ही दुकानांवर फेकले. त्याच्या साथीदाराने आगपेटीतून काडी काढत दुकानावर फेकल्याने मोठा भडका उडून दुकानाने पेट घेतला. विशेष म्हणजे आग लावताना मोठा भडका उडाला होता; मात्र प्रसंगावधान राखत हे दोन्ही माथेफिरू पळाल्याने ते बालंबाल बचावले. नंतर ते दुचाकीवर बसून अंधारात पसार झाले. जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालकांनी वर्तविला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पाहणी केली. माथेफिरूंचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.