छत्रपती संभाजीनगर : हिऱ्यांची नामांकित कंपनी स्टार रेजच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील ११० कोटी रुपये लंपास करण्याचा कट हॅकर्स व तरुणांच्या गटाने रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शहर सायबर पोलिसांना या कटाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सिद्धार्थ उद्यानाशेजारील देवप्रिया हॉटेलमध्ये छापा टाकून सहा जणांना सोमवारी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे देशातील नामांकित वीस कंपन्यांच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग आय.डी.सह त्यातील रकमेची माहिती होती. विशेष म्हणजे, यात एक आंतरराष्ट्रीय इंटरनेट कंपनीच्या बँक खात्यातील १३३ कोटी रुपये ते क्रिप्टो करन्सीमध्ये वळते करणार हाेते.
सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी या कटाबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी यातील टोळी प्रमुखावर पाळत ठेवली. सोमवारी तांत्रिक तपासात त्यांना देवप्रिया हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्याचे कळाले. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या सूचनेवरून त्यांनी सापळा रचला. सोमवारी सायंकाळी यादव, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, चव्हाण यांनी पथकासह छापा मारला. त्यानंतर आरोपींना अटक करून न्यायालयात नेले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अंमलदार संजय साबळे, चंद्रकांत दंडे, रामेश्वर काळे, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अमोल देशमुख, सचिन संपाळ, गोकुळ कुत्तरवाडे, अमाेल सोनटक्के, अभिलाष चौधरी, संदीप पाटील, प्रवीण कुऱ्हाडे यांनी ही कारवाई पार पाडली.
हे आहेत आरोपीहॅकिंग करण्याच्या प्रयत्नात असलेले शेख इरफान शेख उस्मान (२३, रा. गवळीपुरा, छावणी), वसीम इसाक शेख (३६, रा. पडेगाव), शेख कानित शेख अय्युब (१९, रा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर), अब्बास युनूस शेख (३४, रा. मिटमिटा), अमोल साईनाथ करपे (२५), कृष्णा बाळू करपे (२५, रा. दोघेही रा. कोडापूर झांजर्डी, सोलेगाव) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल, दोन लॅपटॉप तपासले असता स्टार रेज कंपनीच्या बँक खात्याची माहिती आढळली.