छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून माजी नगरसेवकाने जावई असलेल्या सख्ख्या भाच्याला मारहाण करुन अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. रविवारी रात्री १२ वाजता तिसगाव शिवारात ही धक्कादायक घटना घडली.
पडेगावच्या आरेफ कॉलनीत राहणारा उमर खान इलियास अहमद खान (२४) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. २०२१ मध्ये त्याचे मामा माजी नगरसेवक अबुलाल अली हश्मी (रा. शाहीन बाग) च्या मुलीशी लग्न झाले होते. परंतू कौटुंबिक वादातून चार महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. मिटमिटा परिसरातच उमरच्या कुटुंबाची साडेपाच एकर शेती आहे. रविवारी तो शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. रात्री ११.४५ वाजता घरी परतत असताना तीसगाव बायपासजवळील रेल्वेरुळाच्या अलीकडे त्याला अबुलालने अडवले. त्याच्यासोबत असलेल्या अबुलाल हसन हश्मी, मोहसीन हश्मी यांनी त्याला बेदम मारहाण केली. अबुलालने चाकू काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमरने वार चुकवताच अबुलाल व मोहसीनने त्याला पकडले. कॅनमध्ये आणलेले रॉकेल त्याच्या अंगावर टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात बघ्यांची गर्दी जमा झाली. भाऊसाहेब ढेपले व गणेश निघोट यांनी वाद सोडवले. त्यानंतर तिघेही पसार झाले.
घर नावावर करण्याची मागणी, मामा अटकेतकौटूंबिक वादानंतर मामा अबुलालने उमरला आरेफ कॉलनीतील घर नावावर करुन देण्याची मागणी केली होती. त्यातून त्यांच्यात सद्या वाद सुरू आहे. घर नावावर न केल्यास त्याच्यासह त्याच्या आई वडिलांना जीवंत मारण्याची धमकी त्याने दिली होती. यात अबुलाल यास अटक करण्यात आल्याची माहिती छावणीचे निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी दिली.