वाळूज महानगर : उद्योगनगरीतील कंपनीसाठी कच्चा माल खरेदी करून गुजरातच्या उद्योजकाला जवळपास पाच कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या उद्योजक भावंडांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोनक हर्षद कटारिया (रा. गुजरात) यांची शिक्षण घेत असताना स्वरित शिशिर श्रीवास्तव व शुभम शिशिर श्रीवास्तव (रा. द्वारा, दिल्ली) या दोघा भावंडांसोबत ओळख झाली होती. शिक्षणानंतर रोनक कटारिया यांनी परदेशातून इम्पोर्टेड प्लास्टिक ग्रॅन्युल (रेजिन) हे मटेरिअल आयात करून विक्री करण्याचा व्यवसाय गुजरातमध्ये सुरू केला होता. तीन वर्षांपूर्वी रोनक कटारिया यांनी सोबत शिक्षण घेणाऱ्या स्वरित व शुभम श्रीवास्तव यांची भेट घेतली असता त्यांनी पुणे येथे आपली प्लास्टिक उत्पादनाची कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीसाठी रॉ-मटेरिअलचा पुरवठा करण्यासाठी कटारिया यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत कच्चा माल पुरवठा केल्यानंतर कटारिया यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची थाप श्रीवास्तव भावंडांनी मारली. पुणे येथे कच्च्या मालाचा पुरवठा केल्यानंतर श्रीवास्तव भावंडांनी कटारिया यांना वाळूज एमआयडीसीत रिद्धी इंडस्ट्रीज व वेदांत इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांनाही कच्चा माल पुरविण्यास सांगितले होते.
पैसे देण्यास टाळाटाळकटारियांनी श्रीवास्तव भावंडांच्या कंपनीत जवळपास पाच कोटींच्या कच्च्या मालाचा पुरवठा केला होता. मालाचे पैसे घेण्यासाठी कटारिया वाळूजला आले असता श्रीवास्तव भावंडांनी पैसे नसल्याचे कारण दाखवत सुरक्षेपोटी ४ कोटी ८४ लाख ५८ हजार ९३९ रुपयांचा धनादेश देऊन तो बँकेत वटविण्यासाठी टाकू नका, तुम्हाला टप्प्या-टप्प्याने पैसे देऊ, अशी थाप मारत करार करून दिला. मात्र मुदत संपूनही मालाचे पैसे न मिळाल्याने कटारिया पुन्हा वाळूजला आले असता श्रीवास्तव भावंडांनी प्रत्येकी १० लाखांचे धनादेश दिले. तेही न वटल्यामुळे कटारिया हे पुन्हा वाळूजला आले असता त्यांना श्रीवास्तव भावंडे पसार झाल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कटारियांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल करून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग सोपवण्यात आले आहे.