छत्रपती संभाजीनगर: सरपंच महिलेविरोधात दाखल प्रकरणाचा चौकशी अहवाल सकारात्मक देण्यासाठी सरपंचपतीकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दीपक लक्ष्मण बागुल (५०)असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची पत्नी सरपंच पदावर कार्यरत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे या यासाठी दाखल प्रकरणाची चौकशी पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बागुल हे करीत आहेत. या चौकशीचा अहवाल नकारात्मक दिल्यास सरपंचपद रद्द होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन तक्रारदार यांनी आरोपी बागुल यांची भेट घेतली.
यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीचे सरपंच पद रद्द होऊ नये, यासाठी सकारात्मक अहवाल देण्यासाठी बागुलने एक लाख रुपयांची लाच मागितली. शिवाय आजच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बागुल ची तक्रार नोंदविली. एसीबीच्या पथकाने दोन पंच तक्रारदार यांच्यासाेबत पाठविले आणि पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष बागुलने तक्रारदार यांच्याकडे पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. आणि लगेच तक्रारदार यांच्याकडून लाचेचे एक लाखाची रक्कमही घेतली. बागुलने लाच लाच घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, पाेलीस उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भीमराज जिवडे, पोलीस नाईक राम गोरे यांनी केली.