छत्रपती संभाजीनगर : चोरी करताना पाहिल्याने शारदाश्रम कॉलनीतील अलका तळणीकर (७२) यांची बुधवारी मध्यरात्री क्रूर हत्या झाली. भाडेकरू अशोक गणेश वैष्णव (३२, मूळ रा. डोणगाव) यानेच ही हत्या केली. त्याने त्यांचे तोंड दाबताच अलका यांनी जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दोन्ही हातांनी त्याला दूर लोटण्याचा प्रयत्नही केला. यात अशोकच्या कानामागे ओरखडे पडले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पाहिल्यानंतर चेहऱ्यावर घाम आल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्याच्या कानामागे काहीसे रक्ताळलेले ओरखडे दिसताच पोलिसांचा संशय दाट झाला व त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
अलका भाचा अजिंक्य यांच्यासोबत राहात होत्या. त्यांना गुरूवारी पितृपाटाची पूजा करायची होती. तळमजल्यावरील मेसचालकाने रात्री त्यांना जेवणाचे ताटही नेऊन दिले. अजिंक्य मध्यरात्रीपर्यंत पोहोचणार असल्याने त्यांनी अशोकला मागील दरवाजा उघडा ठेवायला सांगितला होता. अशोकने तिच संधी साधत आत जात चोरीचा प्रयत्न केला. अलका यांनी त्याला रंगेहाथ पकडताच अशोकने त्यांचे तोंड दाबले. या झटापटीत अलका यांनी कानाजवळ पकडून त्याला लांब ढकलण्याचा प्रयत्न केला. यात अशोकच्या कानामागे त्यांच्या नखाचे ओरखडे उमटले. पोलिसांसमोर नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशोकच्या कानामागील ओरखडे पाहताच पोलिसांना संशय आला.
अशोक पहिल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी मारहाण, दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची आई त्याच इमारतीतील मेसमध्ये पोळ्या करायला यायची. कुटुंब शहरातच असतानाही अशोक एकटा वेगळा राहात होता. दारू पिण्यावरून अलका यांनी त्याला अनेकदा खडसावले होते. अशोकला त्याचाही राग होता, असेही चौकशीत निष्पन्न झाले.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. बोस यांनी अशोकला १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी अशोकला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली.