फुलंब्री ( औरंगाबाद) : येथील देवगिरी साखर कारखान्याच्या मालकीच्या सावंगी येथील जमिनीतून लाखो ब्रास मुरुमाची चोरी झाली या प्रकरणाची विभागीय आयुक्त मार्फत एका महिन्यात चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. यामुळे हे प्रकरण आणखी काही काळ गाजणार दिसून येत आहे.
फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्याची सावंगी शिवारात १३५ एकर जमीन आहे. या जमिनीतून लाखो ब्रास मुरुमाची चोरी करण्यात आली आहे. जमिनीवर मोठ-मोठे खड्डे केल्याने ती पेरणी लायक राहिली नाही. या संदर्भात स्थानिक आमदार हरिभाऊ बागडे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती. पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यानंतर आ. हरिभाऊ बागडे यांनी १६ डिसेंबर २०२२ ला पत्रकार परिषदेतून या प्रकरणी चौकशीची मागणी केली.
दरम्यान, आ. हरिभाऊ बागडे यांनी हा मुद्द विधानसभेत मांडला. यावर उतर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत ३० जानेवारीपर्य्नात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल असे जाहीर केले. तसेच जमीन सपाटीकरणकरून दिली जाईल. मुरुमाचा मोबदला कारखान्याला देण्यासंदर्भात चौकशी अंती निर्णय असेही त्यांनी सांगितले.