- श्रीकांत पोफळे
करमाड : शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन समृद्धी महामार्गाने जालन्याकडे भरधाव जाताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी रोडच्या खाली ३० फूट खोल जाऊन कोसळली. त्यात वाशिम येथील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (दि.३) पहाटे ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा शिवारात झाला.
सुशीलकुमार दिलीप थोरात (३८, रा. मालेगाव, जि. वाशिम) हे या अपघातात ठार झाले. त्यांची पत्नी बबिता थोरात (३६), मुलगी अद्विती थोरात (८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात उपचार करून सायंकाळी वाशिमकडे रवाना करण्यात आले.
समृद्धी महामार्गाला शेंद्रा एमआयडीसीतून प्रस्तावित जंक्शनचे काम चालू असलेल्या जयपूर-भांबर्डा शिवारात चारचाकीवरील (एमएच २० बीबी ९७९३) चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी रोडच्या डाव्या बाजूला खाली ३० फूट जाऊन आदळली. सुशीलकुमार थोरात स्वतः हे वाहन चालवत होते. ते या अपघातात जागीच ठार झाले. त्यांची पत्नी बबिता गंभीर जखमी असून त्यादेखील शासकीय आरोग्य कर्मचारी आहेत. मुलगी अद्विती ही किरकोळ जखमी झाली.
सुशीलकुमार यांचा मृतदेह सोमवारी संध्याकाळी वाशिमला पाठविण्यात आला.
अपघात स्थळापासून जवळच आखाडा असल्याने शेतकऱ्यांनी तत्काळ करमाड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. करमाड पोलिस ठाण्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, बीड जमादार सुनील गोरे, दादासाहेब ढवळे, विनोद खिल्लारे, रिवेश निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.