छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण समितीची ३० सप्टेंबर रोजी मुंबईत तातडीची बैठक होणार आहे. महसूल विभागातील दस्त तपासणी झाली असून इतर बारा प्रकारचे कागदपत्रे तपासले जात आहेत. यासाठी धाराशिव अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आयुक्तालयामध्ये स्थापन करण्यात आली आहे. आठ दिवसात सगळे रेकॉर्ड मुख्य समितीला अहवाल सादर करण्यात येणार आहे. दोन तहसीलदार, अव्वर कारकून, आधी कर्मचारी येथे मुख्य कक्षात नियुक्त केले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होण्यासाठी कुणबी नोंद असलेल्या अभिलेखांचा शोध मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. आजवर ६५ लाख अभिलेख तपासण्यात आले असून, त्यातून हाती काहीही लागलेले नाही. ब्रिटिश काळातील जनगणना, निजाम राजवटीतील पुरावेदेखील सापडले नाहीत. पाच हजारांपर्यंतच्या दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळले आहेत, अशी माहिती संशोधन समिती सूत्रांनी दिली. ८० लाखांहून अधिक अभिलेखांची तपासणी करण्यात येणार आहे.
१०० वर्षे जुने अभिलेख शोधण्याचे आव्हान .....विदर्भातील लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही नोंदी सापडत आहेत. विदर्भातील कोतवाल पंचीमध्ये कुणबी नोंदी आहेत. त्यामुळे तिकडे जातप्रमाणपत्र मिळणे सोपे आहे. बेरर ॲक्ट आणि हिंदी भाषा यामुळे विदर्भात रेकॉर्ड सापडले. मराठवाड्यात १९०१ ते १९३१ पर्यंत झालेल्या जनगणनेचे रेकॉर्डही सापडत नाही. निजाम काळातील प्रशासकीय पुरावे सापडत नाहीत. ३६ ते ४० टक्के नोंदी याच काळातील होत्या. त्याच नोंदी पुढे नियमित झालेले रेकाॅर्ड संशोधनात समोर येत नाही. १०० वर्षे जुने दस्त शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम असून, त्याला वेळ लागेल. असे सूत्रांनी सांगितले.
हैदराबादेतही रेकॉर्ड सापडले नाहीत.....निजामकालीन अभिलेखांच्या तपासणीसाठी राज्य महसूल विभागाचे पथक जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या नेतृत्वात दि. ६ सप्टेंबरला हैदराबादला गेले होते. यात उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, बीड जि. प. सीईओ अविनाश पाठक, बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी व इतर काही अधिकारी व उर्दू भाषा जाणकारांचा समावेश होता. त्या पथकाच्या हाती काहीही लागले नाही. १९३१ व त्यापूर्वीच्या जनगणनेची घरयादी मिळाली नाही. जे दस्तावेज सापडले, त्यातील काही फारशी भाषेमध्ये आहेत. परंतु, कुणबीचा संदर्भ त्यात आढळला नाही. हैदराबादमधील जुने रेकॉर्ड नष्ट करण्यात आल्यामुळे अडचणी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हानिहाय कक्ष स्थापना.....विभागात १० ते १२ अधिकारी वेगवेगळ्या विभागांचे आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक नमुना तयार केला असून, त्यातील मुद्द्यानुसार सापडलेल्या रेकॉर्डची माहिती येणार आहे. १९३० पासूनच्या तुरुंगातील नोंदी तपासण्यासाठी तयारी केली आहे.
६५ लाखांमध्ये पाच हजार कुणबी नोंदी....मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३५ लाखांहून अधिक अभिलेखांपैकी ४,१६० वर कुणबी नोंद प्रथमदर्शनी आढळल्या. आजवर तपासलेल्या ६५ लाख अभिलेखांमध्ये सुमारे ५ हजार नोंदी आढळल्या आहेत. सध्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा, खासरापत्र, चारसालपत्र, तपासणीचे काम सध्या सुरू आहे.