‘मिनी पंढरपूर’ असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावर परिसरातील विविध गावांतून दिंड्या दाखल झाल्या. बीडमधील कनकालेश्वर मंदिर, श्री क्षेत्र चाकरवाडी, कपिलधार, परळी येथील प्रभू वैद्यनाथ या प्रमुख मंदिरांसह ठिकठिकाणी ‘तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम...’ अशा उत्साहात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली.आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा उत्साह गुरुवारी रात्रीपासूनच दिसत होता. प्रमुख मंदिरे एक दिवसापूर्वीच भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. राज्य परिवाहन महांमडळाने विविध ठिकाणी स्वतंत्र बसेसची व्यवस्था केली होती. अनेक भाविक दुचाकीवरुन तर काहींनी पायी जाऊन ठिकठिकाणीच्या मंदिरांत विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असे भक्तिमय वातावरण पहावयास मिळाले. श्री क्षेत्र नारायणगडावर पहाटे दोन वाजता प्रा. जनार्दन शेळके यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी दुग्धाभिषेक करुन विठ्ठल, रुख्माई मूर्तीला नवे वस्त्र परिधान करुन तुळशीची माळ अर्पण करण्यात आली. यावेळी महंत शिवाजी महाराज यांची यावेळी उपस्थिती होती. मध्यरात्रीपासूनच मंदिर परिसर गजबजून गेला होता. रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शनास सुरुवात केली. सकाळी दहा वाजेनंतर एक किमी अंतरापर्यंत रांग लागली होती. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावले होते. वाहनांसाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. गडाच्या पायथ्याशी असलेल्या विविध गावांतून ‘विठ्ठल - विठ्ठल जय हरी विठ्ठल... ’ असा जयघोष करत ंिंदंड्या दाखल झाल्या. वारकऱ्यांनीही दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना फराळ, चहा- पाण्याची व्यवस्था केली होती. परिसरात खेळणी, खाऊ, फराळ साहित्याची दुकाने सजली होती. रात्री उशिरापर्यंत लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.श्री क्षेत्र चाकरवाडीत भाविकांची गर्दीबीड तालुक्यातील चाकरवाडी येथे संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भाविकांना फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.राजा हरिश्चंद्र पिंपरी दुमदुमलीवडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथील राजा हरिश्चंद्राच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. सकाळी महाभिषेक व आरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. पोलीस बंदोबस्त तैनात होता.माजलगावात कार्यक्रमांची रेलचेलमाजलगाव तालुक्यातील केसापुरी येथील केशवराज व मोठीवाडी येथील मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली होती. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.सोमेश्वर, कनकालेश्वरमध्येही रांगाबीडमधील बार्शीरोड वरील सोमेश्वर मंदिर व पेठबीड भागातील कनकालेश्वर मंदिर गजबजून गेले होते. याठिकाणीही महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्त तैनात होता.परळीत मंदिरे गजबजलीयेथील प्रभू वैद्यनाथ, जगमित्र नागा, जाजूवाडी, अंबेवेस येथील विठ्ठल मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. बेलफुल, तुळस अर्पण करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. जागोजागी रांगोळी काढून सुशोभिकरण करण्यात आले. संत जगमिनत्र नागा मंदिरासमोर नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी सचिन जोशी, श्रीकांत मांडे, बाळासाहेब वाघ, अरूण ढाकणे, बाळू वैद्य, शंकर गडदे, अविनाश पवार, शैलेश भालेराव, नितीन बांगर, संदीप मुंडे, अमोल पाटील, आबा गिते, राजेश आघाव उपस्थित होते. वैद्यनाथ मंदिरासमोर स्व. माणिकराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. परगावच्या भाविकांसाठी न.प.च्या वतीने स्रानगृहे उभारली होती. (प्रतिनिधींकडून)
‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’
By admin | Published: July 16, 2016 12:53 AM