‘मासिआ’ या उद्योग संघटनेचे नूतन अध्यक्ष नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. तेव्हा एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी संघटनेला नवीन कार्यकारिणी मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण पवार व अन्य सदस्यांनी चिकलठाणा व वाळूज येथील लघू व मध्यम उद्योगांच्या प्रश्नांवर चर्चा केली. ‘मासिआ’च्या माध्यमातून प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीत रखडलेल्या पायाभूत सुविधा, स्कील डेव्हलपमेंट, शहरातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जालना रोडचे विस्तारिकरण आणि औरंगाबादेत नियोजित कन्व्हेन्शन सेंटरसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा मानस व्यक्त केला.
तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींसाठी केलेेले काम ‘मासिआ’ कधीही विसरणार नाही, असा कृतज्ञभाव ‘मासिआ’चे अध्यक्ष नारायण पवार यांनी व्यक्त केला. यावेळी दर्डा यांनी संघटनेचे काम करताना कोणत्याही एका उद्योगाचा प्रश्न हाती घेऊन तो सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी संघटनेचे सुरेश खिल्लारे, गजानन देशमुख, मनिष अग्रवाल, किरण जगताप, चेतन राऊत, राहुल मोगले आणि अनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन:
‘मासिआ’ या उद्योग संघटनेच्या नवीन कार्यकारिणी मंडळाने ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा. सोबत पदाधिकारी (डावीकडून) सुरेश खिल्लारे, गजानन देशमुख, मनिष अग्रवाल, किरण जगताप, चेतन राऊत, राहुल मोगले आणि अनिल पाटील.