लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी परभणीतून अपहरण केलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबिल्या. त्यातीलच एका जाळ्यात अलगद आरोपी अडकला अन् त्याच्या साथीने दुसºया आरोपीच्याही मुसक्या आवळत अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात आली.चित्रपटातील कथानकाप्रमाणे आरोपींनी पोलीस आणि पालकांना तब्बल १३ तास हुलकावनी दिली. मात्र गुरुवारी रात्री २० लाखांच्या अमिषासाठी एक आरोपी पुढे सरसावला अन् पोलिसांचे काम फत्ते झाले. परभणी शहरातील इदगाह मैदान येथून २५ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अभिषेक अन्सीराम दावलबाजे या १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. आरोपींनी वापरलेली मोडस आॅपरेटींग ही वेगळ्या पद्धतीची असल्याने पोलीसही थक्क झाले होते. यापूर्वी चॉकलेट, बिस्किटांचे अमिष दाखवून अपहरणाचे प्रकार झाले आहेत. परंतु, या प्रकरणात आरोपींनी चार दिवस परभणी शहरात तळ ठोकला. ईदगाह मैदानावर क्रिकेट खेळणाºया मुलांशी गट्टी जमविली. त्यांना रन काढताना बक्षिसे दिली. पाणीपुरी खाऊ घातली आणि त्यानंतर २५ आॅक्टोबरच्या सकाळी मुलाचे अपहरण केले. दुसरे दिवशी आरोपींनी स्वत:च्या फोन ऐवजी क्वॉईन बॉक्सवरुन मुलाच्या वडिलांना फोनवरुन २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यात तडजोड करुन पैसे देण्याचे ठरले. मुलाच्या वडिलांसमवेत पोलिसांनीही जागोजागी वेष बदलून पाळत ठेवत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला.आरोपी ज्या क्रमांकावरुन फोन करीत होते, त्या क्रमांकाचे लोकेशन परभणीतील सायबर सेलच्या माध्यमातून वेळोवेळी घेण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांबरोबरच सायबर सेलमधील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी रात्र जागून काढली. दोन्ही आरोपींनी ६ ते ७ ठिकाणे बदलली. विशेष म्हणजे अपहरण करणाºया मुलासमवेत त्यांनी एकाच वाहनाने प्रवास न करता वाहनेही बदलली. सुरुवातीला आरोपींनी मुलाच्या वडिलांना हैदराबाद येथे बोलविले. त्यानंतर जहिराबाद येथे येण्यास सांगितले. त्याठिकाणीही आरोपी भेटले नाहीत. जहिराबाद येथे जाण्यापूर्वीच तुम्ही उदगीरपासून अलीकडेच थांबा, असा निरोप दिला. मुलाचे वडील, पोलिसांची पथके सोबतच होती. उदगीरपासून काही अंतरावर थांबण्यासाठी सांगितले तेव्हा पोलिसांनी या भागात शेतकरी वेष परिधान करुन आरोपींसाठी जाळे टाकले. परंतु, तेथेही आरोपी समोर आले नाहीत. पुढे उदगीर बसस्थानकावर पोलिसांनी बसचे चालक आणि वाहकाचा वेष घेतला. तेथेही आरोपी मिळाले नाहीत. उदगीरच्या रेल्वेस्थानकावर बोलाविल्यानंतर आरोपी रेल्वेतून पळून जाईल, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रेल्वेगाडीत बसून सापळा लावला होता. मात्र तेथेही आरोपीने हुलकावणी दिली.अखेर उदगीर रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे फाटकावरील केबिनमध्ये पैसे ठेवण्याचा निरोप आरोपींनी दिला. त्यावेळी पोलिसांनी या भागात पाळत ठेवली. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीमध्ये तर दोन-तीन आॅटोरिक्षेही मागवून घेत आॅटोरिक्षा चालक म्हणूून पोलीस कर्मचारी आॅटोमध्ये बसून आरोपींवर नजर ठेवत होते. याच ठिकाणी एका आरोपीने पैशाची बॅग उचलली, दुसरा आरोपी दूर अंतरावर मुलाला घेऊन थांबला होता. बॅग घेऊन एक आरोपी तडक निघाला आणि आॅटोत बसला. या आॅटोचा चालक पोलीस कर्मचारी होता. पोलीस कर्मचाºयाने त्यास पकडले. त्याच्या साह्याने दुसºया आरोपीलाही पकडण्यात आले. हा सर्व प्रकार २६ आॅक्टोबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला. उदगीर शहरामध्ये पोलिसांनी रात्री ८ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत तीन तास आरोपींचा पाठलाग करीत त्यांना पकडण्यात यश मिळविले.
अन् उदगीरमध्ये जाळ्यात अडकले आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:32 AM