औरंगाबाद : सापाची भीती न बाळगता सहज त्याला पकडणाऱ्या एका महिलेचाच सर्पदंशाने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. अस्मा अझहर शेख (३०, रा.मिसारवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अतिधाडस जिवावर बेतले, असे या घटनेबाबत सांगता येईल. विशेष म्हणजे तो नाग सोबत घेऊनच ही महिला घाटीत आली होती.पोलिसांनी सांगितले की, बालपणापासून अस्मा यांना साप पकडण्याचा छंद होता. साप निघाला की, बऱ्याचदा लोक त्यांना बोलावत असत. त्यामुळे मिसारवाडी, नारेगाव परिसरात सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख होती. ६ जुलै रोजी त्यांनी एक कोब्रा नाग पकडला आणि पिशवीत ठेवला. ७ जुलै रोजी रात्री त्या हा साप कुटुंबियांना दाखविणार होत्या. यावेळी नागाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी पिशवीत हात घातला. त्यावेळी त्या सापाने अस्मा यांना दंश केला. हा साप भयंकर विषारी आहे. त्या कोब्राला पिशवीत घेऊन अस्मा आणि त्यांचे नातेवाईक नाजमीनबी या घाटीतील अपघात विभागात आल्या. दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने मेडिसीन विभागात भरती होण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत कोब्राच्या विषाने असर दाखविण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी शर्र्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि शुक्रवारी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान अस्मा यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल भवरे या घटनेचा तपास करीत आहेत.डॉक्टरांना दाखविला जहरी सर्पसर्पदंश झाल्यानंतर तो विषारी होता अथवा नाही, याबाबत डॉक्टर प्रश्न विचारतील हे माहीत असल्याने अस्मा चार ते पाच फूट लांब असलेल्या नागाला सोबत घेऊनच घाटीत आल्या.मेडिसिन विभागातील डॉक्टरांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी साप पिशवीतून बाहेर काढला आणि दाखविला.हा साप भयंकर विषारी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तो नाग पाहून घाटीतील डॉक्टरही थरारले...
...अन् दंशानंतर ‘ती’ कोब्रा घेऊन थेट पोहोचली घाटीत
By admin | Published: July 08, 2016 11:40 PM