औरंगाबाद : त्या काळात सिडको हडको भागातील नागरिकांना पुरेशा नागरी सुविधाच मिळत नव्हत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देशमुख यांनी सिडको हडकोचे प्रश्न मांडले. त्यावरून खंडपीठाने देशमुख यांच्याच नावाने समिती स्थापन करून अहवाल मागवला व त्या आधारे स्यूमोटो याचिका दाखल करून घेतली. त्यातून मिळालेल्या आदेशामुळे सिडको- हडकोत काही प्रमाणात का होईना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
सिडको- हडको या फ्री होल्डचा प्रश्नही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यावर ते आपली कायदेशीर व परखड मते वेळोवेळी मांडत असत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत गोविंदभाई श्रॉफ हे देशमुख यांचे श्रद्धास्थान. प्रदीप देशमुख यांनी जायकवाडीला मिळणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाच्या प्रश्नावर खूपच आग्रही होते. ते एकाकी या प्रश्नावर न्यायालयीन लढा लढत राहिले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विजयेंद्र काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाट्याला येणाऱ्या अपुऱ्या जागांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची बाजू न्यायालयात मांडली. त्यातून बऱ्याचशा जागा वाढवून मिळाल्या. परभणीचे डॉ. के.के.पाटील यांच्या सहकार्याने मराठवाड्याची बलस्थाने आणि दुर्बलता हा ग्रंथ साकारला होता.
प्रदीप देशमुख हे चांगले वक्ते होते. विविध सभासंमेलने ते गाजवत. स्वतंत्र मराठवाडा राज्य स्थापन झाले पाहिजे, याबद्दल ते आग्रही होते. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष असतानाही त्यांनी मराठवाडा स्वतंत्र राज्याची मागणी केली. त्यावरून परिषदेत मोठे वादंग निर्माण झाले होते. विलासराव देशमुख यांच्या जवळचे असलेले प्रदीप देशमुख नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर भाजपमध्ये आले; पण भाजपने त्यांना स्वीकारले, असे कधी दिसले नाही. भाजपमधला त्यांचा सहभाग नाममात्रच राहिला.