लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलीम अली सरोवरात उडी मारून आत्महत्या करावयास निघालेल्या एका ५५ ते ६० वर्षीय महिलेचा जीव वाचविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे बी. ए. प्रथम वर्षाचे विद्यार्थी यशस्वी झाले.
त्याचे असे झाले, अभ्यासाचा एक भाग म्हणून हे पौर्णिमा डोंगरे, अक्षय मिटकरी, किशोर वडेकर, ऋषिकेश श्रीखंडे, मुक्तेश्वर पल्हाळ, सूरज देशमाने, सिद्धांत सदावर्ते, सतीश भारसाकळे, रोहित जाधव, केतन कोलते, श्रीकांत गावित आदी विद्यार्थी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घ्यायला गेले होते. या भेटीनंतर एन्जॉयमेंट म्हणून हे विद्यार्थी बाजूच्याच सलीम अली सरोवराकडे गेले. तेथे हा प्रकार घडला.
फोनवरचे तिचे बोलणे ऐकले अन्...आयुष्याच्या प्रवासाला कंटाळलेली एक महिला आपला जीव देण्यासाठी सलीम अली सरोवराजवळ पोहोचली होती. ती जीव देण्याच्या विचारात आहे, हे विद्यार्थ्यांना जाणवले. एका विद्यार्थ्याकडून तिने मोबाईल मागितला. त्यावर ती समोरच्या व्यक्तीशी ‘या जगाचा निरोप घेण्यासाठी हा फोन केला आहे’ असे ती बोलली. हे या विद्यार्थ्यांनी ऐकले. त्यांचीही मने हेलावून गेली. त्यांनी या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ज्या व्यक्तीशी ती बोलली होती,त्या व्यक्तीचा परत फोनही आला नाही. इकडे या महिलेने मुलांकडे कागद व पेन मागितला. तिला सुसाईड नोट लिहायची असावी.