लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून तालुक्यातील बाबतारा येथे साडी परिधान केलेल्या कारमधील एका विकृत व्यक्तीला ग्रामस्थांनी चोप देत वीरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.गोदापात्राजवळ असलेल्या बाबतारा येथे शुक्रवारी सायंकाळी कारमध्ये साडी परिधान केलेल्या व्यक्तींकडून मुलांना हेरुन वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वृत्त गावात पसरल्याने खळबळ उडाली. ही माहिती गावकºयांनी अगोदर पोलीस पाटील नवनाथ गायकवाड यांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी साडी परिधान केलेल्या व्यक्तीला पकडून चांगले बदडले. यामुळे याचे साथीदार कारसह पळून गेले. या सर्व गोंधळानंतर वीरगावचे पोलीस उपनिरीक्षक संतोष घोडके, पो.कॉ. टिप्परसे यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. या परिसरात यापूर्वीही लहान मुले पळवून नेणारी टोळी वावरत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या सर्व घटनांचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ही घटना अफवा की सत्य, याची खातरजमा करण्याच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी पोलिसांना दिली आहे. हा इसम तालुक्यातील गोयगाव भऊर येथील राहणारा असून तो कोण आहे, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सदर इसमाचे नावही सध्या गुप्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
...अन् महिलेच्या पोशाखातील विकृताला ग्रामस्थांनी बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:58 AM